अमरावती विद्यापीठात यंदापासून नामांकन ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:31 PM2019-08-03T12:31:18+5:302019-08-03T12:32:46+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यावर्षीपासून ऑनलाइन नामांकन प्रणाली लागू करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यावर्षीपासून ऑनलाइन नामांकन प्रणाली लागू करण्यात येत आहे. ही सुविधा बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. व अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी राहील. महाविद्यालयांना ही प्रक्रिया करावी लागणार आहे. त्याकरिता विद्यापीठाने सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या नेतृत्वात विद्यापीठाचा कारभार ऑनलाइन केला जात आहे. पहिल्या टप्प्यात परीक्षेशी संबंधित ‘एंड टू एंड’ कामे ही ऑनलाइन सुरू करण्यात आली आहेत. त्याकरिता विद्यापीठाने एजन्सीसुद्धा नेमली. ऑनलाइन नामांकन प्रणालीची जबाबदारी लर्निंग स्पायरल या संस्थेकडे सोपविली आहे. येत्या १५ ऑगस्टनंतर महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन नामांकन प्रणाली सुरू केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन नामांकन दाखल करतानाच परीक्षा अर्जदेखील भरला जाईल.
ऑनलाइन नामांकन प्रक्रिया ही महाविद्यालयांना पूर्ण करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांकडून आलेल्या कागदपत्रांच्या आधारे ऑनलाइन नामांकन भरावे लागतील. महाविद्यालयनिहाय प्रचार्याकडे लॉग-इन दिले जाईल. प्राचार्यांनी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ऑनलाइन नामांकन विद्यापीठाकडे पाठवावे लागतील. या प्रणालीतून विद्यार्थ्यांचा डेटा महाविद्यालयात राहील. यात जातनिहाय वर्गवारी आणि उत्पन्नाची आकडेवारी सहजतेने उपलब्ध होईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
प्राचार्य, लिपिकांची होणार कार्यशाळा
अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांतील ३८३ महाविद्यालयांत ऑनलाइन नामांकन प्रणाली लागू केली जाणार आहे. या प्रणालीची माहिती देण्यासाठी विद्यापीठात १५ ऑगस्टपूर्वी प्राचार्य, लिपिकांची कार्यशाळा होणार आहे. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने तयारी चालविली आहे.
ऑनलाइन नामांकन हे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातूनच करावे लागणार आहे. ही जबाबदारी विद्यापीठाने महाविद्यालयांवर सोपविली आहे. याप्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा फार्म भरण्याची गरज राहणार नाही. महाविद्यालयांसाठी अतिशय चांगली प्रणाली आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ