पूर्णा प्रकल्पची दोन दारे उघडली ;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:16 AM2021-07-14T04:16:38+5:302021-07-14T04:16:38+5:30
नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा फोटो चांदूर बाजार-ब्राह्मणाडा थडी : मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे पूर्णा प्रकल्पात पाण्याच्या पातळीत वाढ झाली. ...
नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा
फोटो
चांदूर बाजार-ब्राह्मणाडा थडी : मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे पूर्णा प्रकल्पात पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्याच्या परिणामी पूर्णा प्रकल्पाची दोन दारे रविवारी पाच सेंटिमीटरने उघडण्यात आली. त्यामधून पूर्णा नदीपात्रात सात घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग होत आहे.
मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर पूर्णा मध्यम प्रकल्प आहे. गेल्या ४८ तासांत मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पूर्णा प्रकल्पातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली. यात मध्यप्रदेशातील भैसदही मंडळात ६२ मिमी, सावलमेंढा ३५ मिमी, तर बापजाई मंडळात १० मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
पूर्णा प्रकल्पात जिवंत पाण्याचा साठा ३५.३७ दशलक्ष घनमीटर व आजच्या पाण्याची पातळी ४४८.५२ मीटर आहे. आजचा जिवंत साठा २१.४४७३ दशलक्ष घनमीटर असून, टक्केवारी ६०.६४ आहे. पूर्णा प्रकल्पामधून सकाळी ११ वाजता दोन गेट पाच सेमीने उघडण्यात आले असून, या गेटमधून नदीपात्रात सात घनमीटर विसर्ग होत आहे. नदीपात्रामध्ये प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्यामुळे पूर्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. २०१४ मध्ये झालेली पूरस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून अधिकारीसुद्धा प्रकल्पावर विशेष लक्ष देत आहेत.
पहिल्यांदा उघडली दारे
जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच धरणाची दारे उघडली आहेत. त्यापूर्वी पावसाने १५ दिवसांचा खंड दिला होता. आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पाऊस नियमित येईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे.