जड वाहनांना प्रवेश बंदीच
By Admin | Published: February 15, 2016 12:32 AM2016-02-15T00:32:27+5:302016-02-15T00:32:27+5:30
अपूर्वा देऊळगावकर हिच्या अनपेक्षित आणि दुर्दैवी मृत्यूनंतर शहर हादरले. महापालिकेसह पोलिसांवरही ताशेरे ओढले गेले. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
अपूर्वाच्या मृत्यूचे पडसाद : ‘ट्रॅफीक स्टेटस रिपोर्ट’ची तयारी
अमरावती : अपूर्वा देऊळगावकर हिच्या अनपेक्षित आणि दुर्दैवी मृत्यूनंतर शहर हादरले. महापालिकेसह पोलिसांवरही ताशेरे ओढले गेले. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या अपघाताने खडबडून जागे झालेल्या महापालिका व पोलिसांनी गद्रे चौक ते गांधी चौक मार्गावरील दीपार्चनजवळ लोखंडी बारसह ‘जड वाहनास प्रवेश बंदी’चे फलक लावले आहेत. शहरातील इतरही संवेदनशील भागात असे फलक लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक वर्षांपासून शहरातील नागरिक व वाहन चालक या समस्येला तोंड देत आहेत. अलीकडे शहराचा विस्तार वाढला आहे. पार्किंग स्थळांचा अभाव, रस्त्यावरील अतिक्रमण तसेच नियोजनाच्या अभावामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. शहराची लोकसंख्या आठ लाखांच्या घरात असली तरी रस्त्यांची संख्या तेवढीच आहेत. शहरात रोज तीन लाखांपेक्षा वाहने चालतात. वाढलेली लोकसंख्या आणि वाहनांची बेसुमार वाढ पाहता रस्ते ‘जैसे थे’ आहेत.
वाहतूक नियमन ही पोलीस खात्याची आणि महापालिकेची संयुक्त जबाबदारी आहे. मात्र, येथेच नेमकी बोंबाबोंब आहे. नियमदर्शक फलक लावण्यासह रस्त्यांवर पट्टे अंकित करणे, नो पार्किंग झोन, पार्किंग झोन ठरविण्याची जबाबदारी पालिकेची. मात्र, नियोजन आणि दूरदृष्टीचा अभाव आहे. बहुतांश रस्ते अतिक्रमणामुळे अरूंद झाले आहेत.
नियमांचे उल्लंघन करण्याची फॅशन
वाहन चालविताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. स्वत:सह इतरांच्याही जीवाची काळजी घेतल्यास अपघात टाळता येतात. पण, आजकाल वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे ही फॅशन बनली आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढविणे ही काळाजी गरज आहे.