डेंग्यूची ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 10:56 PM2018-07-03T22:56:56+5:302018-07-03T22:59:05+5:30

जुलैच्या पहिल्या तीन दिवसांत शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सात रुग्णांची डेंग्यूसंशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू या कीटकजन्य आजाराचे संक्रमण होत असते. यंदाही या आजाराची लक्षणे आढळलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना दिसत आहे. दरम्यान, शहरातील खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश म्हणून उपचार घेत असलेल्या सात रुग्णांचे रक्तजलनमुने तपासणीसाठी यवतमाळ येथील सेंटिनल सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.

'Entry' of dengue | डेंग्यूची ‘एन्ट्री’

डेंग्यूची ‘एन्ट्री’

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात साथ पसरण्याची भीतीतीन दिवसांत सात रुग्ण : खासगी रुग्णालयात संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जुलैच्या पहिल्या तीन दिवसांत शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सात रुग्णांची डेंग्यूसंशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू या कीटकजन्य आजाराचे संक्रमण होत असते. यंदाही या आजाराची लक्षणे आढळलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना दिसत आहे. दरम्यान, शहरातील खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश म्हणून उपचार घेत असलेल्या सात रुग्णांचे रक्तजलनमुने तपासणीसाठी यवतमाळ येथील सेंटिनल सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.
जून महिन्यात एकूण १४ डेंग्यूसदृश रुग्णांचे रक्तजलनमुने घेण्यात आले. जुलैच्या पहिल्या तीन दिवसांत सात रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली असल्याचे निदान करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सात डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये डॉ. मनोज निचत यांच्याकडे चार, दयासागरमध्ये दोन, तर एक रुग्ण डॉ. अजय डफळेंकडे दाखल आहे. हे सातही रुग्ण गणेशनगर, ज्योती कॉलनी, चक्रधरनगर, नवाथेनगर, नवी वस्ती बडनेरा व महालक्ष्मीनगर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने १ जानेवारी ते २ जुलैपर्यंत एकूण ३० संशयित रुग्णांचे सिरम सॅम्पल जिल्हा हिवताप अधिकारी यांच्यामार्फत यवतमाळला पाठविले असून, १२ डेंग्यू निगेटिव्ह आढळून आले. १८ रुग्णांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. दरम्यान, अवघ्या दोन दिवसांत डेंग्यूचे सात रुग्ण संशयित आढळल्याने साथीची भीती व्यक्त होत आहे.
लागण कशी होते?
स्वच्छ, साचलेल्या पाण्यात अंडी घालणारा एडीस इजिप्ती हा डास डेंग्यूचे विषाणू पसरवतो. हे डास शक्यतो सकाळी व संध्याकाळी चावतात. पावसाळ्यानंतर तापमानात होत असलेल्या चढ-उतारांमध्ये डेंग्यूच्या विषाणूंची संख्या वाढते आणि त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढते. डासांनी वहन करून आणलेल्या विषाणूंशी लढण्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडली की, डेंग्यूची लागण होते.
लक्षणे
डेंग्यूची लक्षणे ही सर्वसामान्य विषाणू संसर्गाप्रमाणेच असतात. मात्र, काही वेळा दोन-तीन दिवसांनी ताप उतरला की, असह्य डोकेदुखी होऊ लागते. उलट्या होतात. अंग मोडून येते, सूज येते. डेंग्यूच्या तापामध्ये सांधे दुखतात. अंगावर चट्टेही उठतात.
साचलेले पाणी काढून टाका
घरात पाण्याचा साठा केल्यास या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात पाणी साचून त्यात हे डास वाढतात. उन्हाळ्यात कूलरच्या पाण्यातही हे डास वाढू शकतात. घर व परिसरात डास होणार नाहीत, याची काळजी घेतल्यास डेंग्यू व मलेरिया या आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हे डास दिवसा चावत असल्याने दिवसादेखील डासांपासून संरक्षणाची गरज असते .

तीन दिवसांत खासगी रुग्णालयात डेंग्यूसंशयित म्हणून सात रुग्णांची नोंद झाली. त्या सातही रुग्णांचे रक्तजलनमुने परीक्षणासाठी पाठविण्यात आले. डेंग्यूची साथ आटोक्यात आहे. महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.
- डॉ. सीमा नैताम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

Web Title: 'Entry' of dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.