सर्पमित्राची कोब्रासह ‘इर्विन’मध्ये एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:12 PM2019-07-04T23:12:28+5:302019-07-04T23:12:45+5:30
दंश करणाऱ्या विषारी कोब्राला घेऊनच सर्पमित्र ‘इर्विन’मध्ये उपचारासाठी दाखल झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नजीकच्या सुकळी लसनापूर येथे घडली. ईश्वर अभिमन्यूू माठे असे या सर्पमित्राचे नाव असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दंश करणाऱ्या विषारी कोब्राला घेऊनच सर्पमित्र ‘इर्विन’मध्ये उपचारासाठी दाखल झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नजीकच्या सुकळी लसनापूर येथे घडली. ईश्वर अभिमन्यूू माठे असे या सर्पमित्राचे नाव असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भातकुली तालुक्यातील सुकळी लसनापूर येथे गुरुवारी दुपारी ४ वाजता गावकऱ्यांना नाग निदर्शनास आला. गावकरी त्याला ठार करण्याच्या प्रयत्नात असतानाच गावातील सर्पमित्र ईश्वर माठे यांनी घटनास्थळ गाठून हा नाग पकडला. मात्र, त्याने ईश्वर माठे यांच्या हाताला चावा घेतला. यानंतर नाग हाती घेऊनच त्यांनी थेट जिल्हा सामान्य रूग्णालयात गाठले. हाती साप असल्याचे पाहून रुग्णालयातही एकच पळापळ झाली. डॉक्टर उपचार करण्यास धजावत नव्हते. अखेर रुग्णालयात जमलेल्या काहींनी डॉक्टरांना हिंमत दिली. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच स्थानिक सर्पमित्राने हातातील कोब्रा एका बरणीत बंद केला. या गोंधळात उपचारास विलंब झाल्याने प्रकृती खालावली आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने डॉक्टरांनी ईश्वर माठे यांना अतिदक्षता विभागात हलविले. अद्याप त्याची प्रकृती ंिचंताजनक आहे.
दरम्यान, बरणीचे झाकण व्यवस्थित लागले नव्हते. मात्र, बिकट प्रसंग टळला, अशी माहिती वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने अमोल गावनेर याने ‘लोकमत’ला सांगितले.
वनविभागाकडून रेस्क्यू
उपचारासाठी सापासह दाखल झालेले सर्पमित्र ईश्वर यांच्याकडून वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने भरणीसह कोब्रा ताब्यात घेतला. त्यानंतर हा विषारी नाग इंदला जंगलात नेण्यात आला. प्लास्टिक बरणी खाली ठेवताच क्षणात कोब्रा जंगलात अदृश्य झाला.