जरूडमध्ये सुसज्ज कोविड केअर, विलगीकरण कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:43+5:302021-05-27T04:12:43+5:30
प्रशांत काळबेंडे - जरूड : स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता, सुसज्ज कोविड केअर, विलगीकरण कक्ष सुरू ...
प्रशांत काळबेंडे -
जरूड : स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता, सुसज्ज कोविड केअर, विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे. वरूड शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना, नागरिकांना या सुविधांची अद्याप प्रतीक्षा आहे. त्यामुळे या सुविधा मिळणार की नाही, असा प्रश्न नागरिक पालिकेला विचारत आहेत.
राज्यातील शहरी भागात रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असताना, ग्रामीण भागात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. याचा अंदाज घेतला असता ग्रामीण भागात दाटीवाटीची वस्ती असून, एकाच खोलीत संपूर्ण परिवार राहत असल्याने एकाला जरी कोविड लागण झाली तरी संपूर्ण परिवार व आजूबाजूचे लोक बाधित होतात. त्यामुळे शासनाने एक आदेश काढून पंधराव्या वित्त आयोगातील विशेष निधीतील २५ टक्के रक्कम कोविडग्रस्तांच्या आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याची स्थानिक प्रशासनाला मुभा दिली आहे. त्या अनुषंगाने जरूड येथे ३० बेडचे कोविड केअर सेंटर व २० बेडचे विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले असल्याचे सरपंच सुधाकर मानकर यांनी सांगितले. तथापि,
अवघ्या चार किमी अंतरावरील तालुका मुख्यालयी नगरपालिका प्रशासनाने काेरोनाला गांभीर्याने घेतले नसल्याने वरूड शहरात रुग्णसंख्या वाढतच जात आहे. त्यांच्या विलगीकरणाची सुविधा नसल्याने हे रुग्ण घराबाहेर पडून प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजीव पाटील व नगराध्यक्ष यांनी या सुविधा देण्यास अद्याप पाऊल न उचलल्याने पालिका प्रशासनावर तयार वरूडकरांचा तीव्र रोष आहे.