घरकूल लाभार्थ्यांना मिळावा समान वाढीव निधी
By Admin | Published: March 4, 2016 12:18 AM2016-03-04T00:18:43+5:302016-03-04T00:18:43+5:30
शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत चांदूरबाजार शहरातील पूर्ण करण्यात आलेल्या..
मागणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन
सुमित हरकुट चांदूरबाजार
शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत चांदूरबाजार शहरातील पूर्ण करण्यात आलेल्या व शिल्लक असलेल्या घरकुलाच्या लाभार्थींना शासनाचे प्राप्त वाढीव निधीचा समान लाभ द्यावा, अशी मागणी पालिकेचे उपाध्यक्ष मुजफ्फर हुसैन यांनी केली आहे.
शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील विविध झोपडपट्ट्यांचे सन २००८-०९ मध्ये सर्वेक्षण करून एकूण ९८५ प्राथमिक लाभार्थींची यादी तयार करण्यात आली व एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातील ९८५ घरकुलांसह रकमेच्या प्रस्तावावर केंद्र शासनाकडून १६ डिसेंबर २००८ रोजी मंजुरी प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने २८ जुलै २०११ रोजी प्रत्यक्ष लाभार्थींमार्फत घरकूल बांधकामाकरिता १.२५ लक्ष प्रती घरकूल (२७० चौ. फूट याप्रमाणे) बांधकामाची परवानगी दिली. त्यानुसार प्राप्त निधीमधून एकूण ९८५ पैकी ३२१ घरकुलांचे बांधकाम मार्च २०१३ मध्ये पूर्ण करण्यात आले. परंतु या निधीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण होत नसल्याने नगरपालिकेने १५ एप्रिल २०१४ ला शासनाकडून उर्वरित ६६४ घरकुलांचे बांधकाम करण्याकरिता वाढीव निधी मंजूर करण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत प्रती घरकूल घटकाकरिता कमाल किंमत २ लक्षप्रमाणे निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार शासनाकडून ६६४ घरकुलाकरिता एकूण ४.८० कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर करण्यात आला आहे.
शहरातील एकूण ९८५ घरकुलांपैकी पूर्ण करण्यात आलेल्या ३२१ घरकुलाच्या लाभार्थिंनी घरकुलासाठी मंजूर केलेल्या १ लक्ष २५ हजार या रकमेमध्ये घरकुलाचे बांधकाम पूर्ण होत नसल्याने अनेकांनी स्वत: खर्च करून त्यांचे घरकुलाचे वाढीव बांधकाम पूर्ण केले. उर्वरित ६६४ घरकुलांकरिता शासनाच्या वाढीव निधीअंतर्गत सर्व ९८५ लाभार्थिंना समान निधी मिळावा, अशी मागणी केली आहे.