एरंडगाव, मांजरी म्हसला येथील वृक्षलागवडीवर लाखोंचा चुराडा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:35+5:302021-06-10T04:10:35+5:30
फोटो - नांदगाव खंडेश्वर जेवडे ०९ पी सामाजिक वनीकरणचा उपक्रम वाया, पंचायत समिती उपसभापतींची चौकशीची मागणी नांदगाव खंडेश्वर : ...
फोटो - नांदगाव खंडेश्वर जेवडे ०९ पी
सामाजिक वनीकरणचा उपक्रम वाया, पंचायत समिती उपसभापतींची चौकशीची मागणी
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील एरंडगाव, मांजरी म्हसला या गावांतील ई-क्लास जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागाने सन २०१९ मध्ये केलेल्या वृक्ष लागवडीवर लाखो रुपयांचा चुराडा झाला असल्याची तक्रार पंचायत समितीचे उपसभापती राजीव घोडे यांनी केली आहे. याप्रकरणी तहसीलदारांनी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सन २०१९ ला एरंडगाव येथे सामाजिक वनीकरण विभागामार्फत ५५५५ रोपे लावण्यात येऊन त्यावर ४ लाख ८४ हजार रुपयांचा खर्च झाल्याचे दर्शवण्यात आले. याबाबत सामाजिक वनीकरण विभागाकडे पंचायत समितीने माहिती मागवली असता, त्यांनी दिलेल्या २८ सप्टेंबर २०२० च्या अहवालात याठिकाणी ५३०० रोपे जिवंत असल्याचे दर्शविण्यात आले. पण, प्रत्यक्षात तेथे फक्त १०० रोपेच जिवंत आहेत. मांजरी म्हसला येथेसुद्धा १९ हजार ९९८ रोपे लावण्यात आली होती. त्यावर संबंधित विभागाने १७ लाख ७६ हजार रुपयांचा खर्च झाल्याचे दर्शविले. तेथील १८ हजीार ४०० रोपे जिवंत असल्याचा अहवाल सादर केला होता. पण प्रत्यक्षात तेथेही फक्त २०० रोपेच जिवंत असल्याचे तक्रारकर्त्याने सांगितले.
एरंडगाव व मांजरी म्हसला येथील सामाजिक वनीकरण विभागामार्फत झालेल्या वृक्षलागवडीची चौकशी करावी, अशी मागणी उपसभापती राजीव घोडे यांनी तहसीलदारांकडे केली. ९ ऑक्टोबर २०२० पासून याप्रकरणी वारंवार पाठपुरावा केला जात आहे. पण, अद्यापही याबाबतची माहिती पंचायत समिती सभागृहाला सादर झाली नसल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
-------------------
यापूर्वीही गाजला मुद्दा
मांजरी म्हसला व एरंडगाव येथील सामाजिक वनीकरण विभागांतर्गत केलेल्या वृक्षलागवडीत गैरप्रकार झाल्याचा मुद्दा यापूर्वी पंचायत समितीच्या १७ जुलै २०२० च्या सभेत गाजला होता. या ठिकाणी किती झाडे लावण्यात आली व किती जिवंत आहेत, याबद्दल विचारणाही झाली होती. सामाजिक वनीकरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी पंचायत समितीच्या सभेला सतत गैरहजर राहत असल्याबद्दल रोषही व्यक्त केला गेला होता.
===Photopath===
090621\img-20210609-wa0022.jpg
===Caption===
एरंडगाव वृक्ष लागवडीवर लाखोंचा चुराडा.