नुकसानभरपाईच्या धनादेशात चूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:13 AM2021-03-06T04:13:29+5:302021-03-06T04:13:29+5:30
मोर्शी : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाचा धनादेशावर शब्दांत १२ लाख ३५ हजार ४०० व अक्षरात १ लाख २३ हजार ...
मोर्शी : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाचा धनादेशावर शब्दांत १२ लाख ३५ हजार ४०० व अक्षरात १ लाख २३ हजार ५४० रुपये असे वेगवेगळे लिहिण्यात आल्याने बँकेने तो धनादेश तहसीलदार कार्यालयात परत केला. परिणामी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची ती रक्कम अद्यापही जमा झालेली नाही.
मोर्शी तालुक्यात सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० मध्ये अवकाळी पाऊस, गारपीट झाल्यामुळे पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपये नुकसान भरपाई रक्कम प्राप्त झाली. त्यापैकी काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा करण्यात आली नसल्याने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, आनंद सदातपुरे, अंकुश घारड यांच्या नेतृत्वात तहसीलदारांकडे दाद मागण्यात आली.
दरम्यान, उर्वरित शेतकऱ्यांच्या अनुदानाचा १२ लाख ३५ हजार ४०० रुपयांचा धनादेश जिल्हा बँकेच्या मोर्शी शाखेत पाठविण्यात आला. परंतु, तो धनादेश चक्क १ लाख २३ हजार ५४० रुपयांचा लिहिण्यात आल्याने बँकेने तो धनादेश तहसील कार्यालयाला परत केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये तहसीलदारांविरुद्ध तीव्र रोष निर्माण झाला आहे.
संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात धाव घेऊन चुकीचा धनादेश पाठविल्याबद्दल विचारपूस केली असता, तहसीलदारांनी गायकवाड हे सुटीवर असल्याने धनादेश पाठविण्यास विलंब झाला तसेच या प्रकरणी तलाठ्यावर कारवाई करण्यात येईल, अशी उडवाउडवीची उत्तरे शेतकऱ्यांना दिली. ज्यांनी हा चुकीचा धनादेश लिहिला, त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्यावतीने धनादेश लिहिताना चूक झाली असली तरी स्वाक्षरी करणारे प्रथम श्रेणी अधिकारी तहसीलदारांनी डोळे बंद करून स्वाक्षरी केली का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.