राजुराबाजार कोरोनाचा उद्रेक; आरोग्य यंत्रणा ढिम्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:13 AM2021-04-23T04:13:19+5:302021-04-23T04:13:19+5:30
पान २ ची लिड राजुरा बाजार : वरूड तालुक्यात कोरोना संसर्गाने तांडव सुरू असून, मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. ...
पान २ ची लिड
राजुरा बाजार : वरूड तालुक्यात कोरोना संसर्गाने तांडव सुरू असून, मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. राजुरा बाजारमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या अधिक आहे. मात्र, प्रशासकीय आरोग्य यंत्रणा ढिम्म आहे. पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्यानंतरही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग न् कंटेन्मेंट झोन नावापुरते आहेत.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून वरूड तालुक्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. राजुरा बाजार परिसरातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव आहे. दवाखाना, बँक, पतसंस्था, महावितरण कार्यालय असल्याने दररोज विविध गावांतील शेकडो नागरिक आवागमन करीत असतात. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा, स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्यावतीने बाजारपेठ बंद करण्यापलीकडे काहीही हालचाल केली नाही. आठ महिन्यांपासून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर नाही. आरोग्य यंत्रणेला मूलभूत सुविधांचा विसर पडला की, काय? अशी परिस्थिती आहे.
तालुक्यासह वरूड शहरातील खासगी दवाखाने फुल्ल आहेत. तापाने फणफणणारे रुग्ण खासगी रुग्णालयातील औषधी घेऊन घरातील इतर रुग्ण वाढीसाठी हातभार लावत आहेत. तालुक्यात राजुरा बाजार येथे कोरोना ' हॉटस्पॉट ' निर्माण झाला आहे.
चाचणी अहवाल लवकर येत नाही, गावात सॅनिटायझेशन नाही, जनजागृती नाही, गावात पॉझिटिव्ह रुग्ण बिनदिक्कतपणे फिरत आहे. यावर कुणाचेही बंधन नाही. हे थांबवण्यासाठी कुणीही प्रयत्न करीत नाही. कंटेन्मेंट झोनमध्ये बिनधास्तपणे रुग्णाचा वावर होत आहे. त्यामुळे गावातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने जागे होण्याची वेळ आली आहे. आरोग्य यंत्रणा सपशेल कोलमडली आहे. अन्यथा राजुरा हे गाव अर्धे अधिक बाधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोट
वरूड तालुक्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण सध्या राजुरा गावात आहे. बाजारपेठचे गाव आता कोरोनासाठी प्रसिद्ध झाले. स्थानिक ग्रामपंचायत यंत्रणा, आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा परिषद सदस्यांचे गावाकडे दुर्लक्ष आहे. ग्रामविकास अधिकारी सतत गैरहजर राहतात. त्यांना आता तातडीने हालचाल करणे आवश्यक आहे. अन्यथा गावात कोरोनाचा वणवा पसरेल.
- दिलीप भोंडे,
माजी उपसभापती, पंचायत समिती वरुड
कोट २
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करणे आवश्यक आहे. वारंवार हात धुणे, मास्क लावूनच घराबाहेर जावे. आवश्यक असल्यावर बाहेर जावे. विनाकारण फिरू नये. त्रिसूत्रीचे पालन करावे.
डॉ. शुभा शेळके,
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, राजुरा बाजार
कोट ३
गावात दररोज मुनादी देऊन नागरिकांना सजग करण्यात येत आहे. गुरुवारचा आठवडी बाजार आधीच बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बाजारपेठ ७ ते ११ पर्यंतच करण्यात आला आहे.
- मनोज राऊत,
ग्रामविकास अधिकारी, राजुरा बाजार