पॅरालवर सुटला नि पुन्हा खून केला ! (सुधारित)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:26+5:302021-07-02T04:10:26+5:30
रात्रीच्या अंधारात विळ्याने वार, आरोपी बारा तासांच्या आत गजाआड चांदूर रेल्वे : तालुक्यातील कळमगाव येथे ४१ वर्षीय शेतमजूर व्यक्तीचा ...
रात्रीच्या अंधारात विळ्याने वार, आरोपी बारा तासांच्या आत गजाआड
चांदूर रेल्वे : तालुक्यातील कळमगाव येथे ४१ वर्षीय शेतमजूर व्यक्तीचा मानेवर विळ्याने वार करून खून करण्यात आला. बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. विकास प्रल्हाद गवई (४१, रा. कळमगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी भारत रामराव दुर्योधन (४६, रा. कळमगाव) याला गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. त्याने खुनाची कबुली दिली आहे. कोरोनाकाळात पॅरोलवर सुटून आल्यानंतर त्याने हा खून केला. तो सात वर्षांपूर्वी केलेल्या खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. त्याच्यावर आता दुसऱ्यांदा खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी भारतने खुनाची कबुली दिली असली तरी कारण उघड झालेले नाही.
पोलीस सूत्रांनुसार, बुधवारी रात्रीच्या सुमारास कळमगाव येथील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. नेमकी ती संधी साधत अंधारात गावातील बुद्धविहाराजवळ विकास प्रल्हाद गवई याच्या मानेवर अज्ञाताने विळ्याने हल्ला केला होता. मानेवर जबर वार झाल्याने गवई यांचा जागीच मृत्यू झाला.
खून झाल्याची माहिती मिळताच चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते, सहायक ठाणेदार राऊत, बीट जमादार संदीप शिरसाट व चालक जगदीश राठोड घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता चांदूर रेल्वे येथाल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे पोलिसांनी अवघ्या सात ते आठ तासांमध्ये या घटनेचा उलगडा केला.