काळाबाजार रोखण्यासाठी १५ भरारी पथके स्थापित
By admin | Published: April 26, 2015 12:13 AM2015-04-26T00:13:39+5:302015-04-26T00:13:39+5:30
मागील वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाल्याने यावर्षी बियाण्याची टंचाई भासणार आहे.
महिनाभरावर खरीप : जिल्हा कृषी अधिकारी उदय काथोडे यांची माहिती
अमरावती : मागील वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाल्याने यावर्षी बियाण्याची टंचाई भासणार आहे. याचा फायदा घेऊन बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये, तसेच अप्रमाणित बियाणे विकले जाऊन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्यात एक व जिल्ह्याचे एक असे १५ भरारी पथके नेमण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी उदय काथोडे यांनी दिली.
याच अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात सर्व कृषी केंद्रधारकांची बैठक येत्या ५ मे पर्यंत घेण्यात येऊन त्यांना याविषयी सूचना दिली जाणार आहे. बियाण्यांचा काळाबाजार व अप्रमाणित बियाणे किंवा एमआरपीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याचे आढळल्यास त्या दुकानांचा परवाना रद्द करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती काथोडे यांनी दिली.
शेतकऱ्यांना बियाण्यांविषयी शंका असल्यास किंवा दुकानदार अधिक दराने विक्री करीत असल्यास १८००००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अपुऱ्या पावसाअभावी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. परंतु असणाऱ्या सोयाबीनमध्ये उगवाणशक्ती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्यांवर बीज प्रकिया करुन पेरणी करण्यास हरकत नाही. मागील हंगामात सोयबाीन काढणीच्या वेळी पाऊ स आल्यामुळे सोयाबीन डागी झाले. त्यामुळे उगवणशक्तीवर परिणाम झाला होता. यावेळेस अशी स्थिती नाही, असे काथोडे यांनी सांगितले.
यावर्षी जवळपास साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान दोन लाख क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. यापैकी सार्वजनिक ७५ हजार, खासगी ३९ हजार ७५० व महाबीजव्दारा ५० हजार बियाणे उपलब्ध होणार असल्याने फारशी टंचाई राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
बियाणे खरेदी करताना अशी घ्या काळजी
अधिकृत परवानाधारक दुकानदाराकडून कपाशी बियाण्यांची खरेदी करावी.
बियाणे खरेदी केल्यावर त्याचे पक्के बिल न चुकता घ्यावे.
कपाशी बियाण्यांच्या पाकिटावरील सरकारमान्य चिन्ह तपासून घ्यावे.
बोलगार्ड-१ मध्ये उपलब्ध वाण ८३० रुपये व बोलगार्ड-२ मधील वाणांची ९३० रुपये या शासनमान्य दरानेच खरेदी करावी.
सरकारमान्य बोलगार्डचे चिन्ह व बोलगार्ड २ चिन्हासोबत दोन उभ्या रेषा तपासून घ्याव्यात.
दुकानदार पक्की पावती देत नसल्यास १८००००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
बियाण्यांचे पाकीट वरच्या बाजूने न फाडता खालच्या बाजूने फाडावे.
बियाण्यांचे पाकीट सीलबंद/मोहरबंद असल्याची खात्री करुनच खरेदी करावे.
बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटवरची अंतिम मुदत तपासावी.
टॅग व लेबल पाहूनच करावी बियाण्यांची खरेदी
बियाण्यांच्या पिशवीवरील टॅग बघूनच बियाणे खरेदी करावे. या टॅगवरील लॉट नंबरवरुन त्या बियाण्यांची निर्मिती करणारे राज्य व बियाणे निर्मिती करणारे राज्य कळते. त्यामुळे फसवणूक टाळता येते. लेबल नसलेल्या बियाण्यांचे पाकीट खरेदी केल्यास फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या नावाने होऊ शकते फसगत
आरआर, राऊंडअप बीटी, तणावरची बीटी, वीडर्गा यासह अन्य नावाने बोगस व बेकायदेशीर बियाणे विक्री होण्याची शक्यता आहे.
हे बियाणे अधिकृत नाहीत, या बियाण्यांच्या विक्रीला शासनाची परवानगी नाही.
हे बियाणे जादा दराने विकले जातात व बिल दिले जात नाही.
या बियाण्यांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केलेली आहे, याचा उल्लेख नसतो.
पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण दिलेले नसते.
या बियाण्यांमुळे शतीचे व पर्यावरणाचे नुकसान होते.