भाऊसाहेबांच्या गावी कृषी कंपनी स्थापन व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2017 12:11 AM2017-04-20T00:11:25+5:302017-04-20T00:11:25+5:30
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेद्वारे (आत्मा) जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कंपनी स्थापित केल्या जात आहे. ही चांगली बाब आहे.
वीरेंद्र जगताप : खरीप पूर्व आढावा बैठकीत ‘आत्मा’ला सूचना
अमरावती : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेद्वारे (आत्मा) जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कंपनी स्थापित केल्या जात आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, देशाचे पहिले कृषीमंत्री असलेले डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या पापळ या जन्मगावी अशा प्रकारची कंपनी स्थापन्याविषयी प्रयत्न व्हावेत, अशी सूचना आ. वीरेंद्र जगताप यांनी खरीपपूर्व आढावा बैठकित केली.
‘आत्मा’ यंत्रणेचे अधिकारी कधीही लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाहीत. याविषयी आ. जगताप यांनी प्रकल्प संचालक मिसाळ यांना खडेबोल सुनावले. या यंत्रणेमध्ये समन्वय व अपुऱ्या मनुष्यबळाअभावी ‘आत्मा’ हरविला असल्याची टिका त्यांनी केली. ‘आत्मा’मध्ये तालुका तंत्रज्ञान अधिकाऱ्यांची कंत्राटी स्वरुपातील पदे रिक्त आहेत. ते जिल्हास्तरावर भरण्याचे अधिकार असल्याने तातडीने भरण्यात यावे, अशी सूचना आ. जगताप यांनी केली.
या यंत्रणेद्वारे कृषी मित्रांची बैठक होत नाही. किंबहुना या जागाच रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे स्थानिक ग्रामपंचायतीच्या मार्फत भरण्यात याव्यात, अशा सूचना केल्या. या यंत्रणेचे प्र्रकल्प संचालक नेहमीच अनुपस्थितीत असतात. त्यामुळे त्यांचा समन्वय नाही. नियोजन नसल्यामुळेच आत्मा यंत्रणेचे प्राण हरविला असल्याची बोचरी टीका आ. जगताप यांनी केली.
यावर आत्माची रिक्त पदे तातडीने भरावी व संबंधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना कृषी संबंधी योजनाबाबत विचारात घ्यावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिलेत.