आंबे पिकविण्यासाठी इथिलिन स्प्रे, चायनिज पावडरचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:52 AM2019-05-13T00:52:08+5:302019-05-13T00:52:45+5:30
आंबे पिकल्याचे चिन्ह म्हणजे त्यांचा पिवळेपणा. या रंगाला ग्राहक मोहून जातात. मात्र, त्यासाठी फळांच्या राजावर चक्क इथिलिन स्प्रे, पावडर तसेच कॅल्शियम कार्बाइड आदी घातक रसायनांचा प्रमाणाबाहेर वापर होत असल्याचे अमरावती येथील फळबाजारातील चित्र आहे.
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आंबे पिकल्याचे चिन्ह म्हणजे त्यांचा पिवळेपणा. या रंगाला ग्राहक मोहून जातात. मात्र, त्यासाठी फळांच्या राजावर चक्क इथिलिन स्प्रे, पावडर तसेच कॅल्शियम कार्बाइड आदी घातक रसायनांचा प्रमाणाबाहेर वापर होत असल्याचे अमरावती येथील फळबाजारातील चित्र आहे. त्यामुळे आंब्यासोबत प्रत्येकाच्या घरात आजार मोफत जात असल्याने आरोग्य सांभाळणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
कृषिउत्पन्न बाजार समितीच्या फळ व भाजीबाजारात विविध राज्यांतून दररोज शेकडो क्विंटल आंबे येतात. याच ठिकाणी सकाळी त्यांचा लिलाव होतो. ठोक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यावसायिक सदर आंब्याची खरेदी करतात. या साखळीत आंबे पिकविण्यासाठी इथेलिन स्प्रेचा प्रमाणापेक्षा जास्त वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आंबे पिकविण्यासाठी इथेलिन स्प्रे वैध असल्याचे व तशी परवानगी सुध्दा असल्याचे व्यावसायिक सांगतात. त्याचे प्रमाण १०० पीपीएम (पार्ट पर मिलियन) एवढा ठरले आहे. मात्र, आंबे झटपट पिकवून बाजारात विकण्यासाठी यापेक्षा जास्त प्रमाणात इथिलिनचा वापर केला जातो. व्यापाऱ्यांकडून दुसºया दिवशीच आंबे पिकले पाहिजे, असे नियोजन केले जाते. त्यामुळे १०० पीपीएम पेक्षा जास्त् इथिलिन स्प्रेचा वापर केला जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
पूर्वी कॅल्शियम कार्बाइडने सर्रास आंबे पिकविण्यासाठी वापर करण्यात येत होता. आताही तो छुप्या पद्धतीने करण्यात येत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मात्र, याची जागा चायनिज पुड्यांनी घेतली आहे. यामध्ये सुद्धा कार्बाइड असते. आंब्याच्या एका कॅरेटमध्ये ती टाकली व वरून पेपर रद्दी टाकली की, आंबे पिकतात, असे एका व्यावसायिकाने सांगितले.
सतत जास्त प्रमाणात इथिलिन स्प्रे, पावडर व कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेले आंबे सेवन केले, तर कर्करोगासारखा घातक आजारही होऊ शकतो. दुर्दैवाने यावर नियंत्रण ठेवण्याकडे अन्न व प्रशासन विभागाने दुर्लक्ष केले आहे.
५० पेक्षा जास्त फळ व्यापारी
अमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीच्या फळ व भाजीबाजारात नोंदणीकृत ५० पेक्षा जास्त फळांचे व्यापारी आहेत. त्यांच्यामार्फत विविध फळांची विक्री करण्यात येते. उन्हाळ्यात आंबे विक्रीतून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शहरातील पाचशेपेक्षा जास्त किरकोळ विक्रेते या ठोक व्यापाºयांकडून आंबे विकत घेऊन शहरातील विविध चौकांत विक्री करीत असल्याची माहिती आहे. पिवळेधम दिसणारे हे आंबे हे रसायनांनी पिकविले जात असल्याने शरीरासाठी घातक ठरतात. ग्राहकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.