१४ ग्रामपंचायतीचे ‘सुंदर गाव’ अंतर्गत मूल्यमापन, सीईओंच्या अध्यक्षतेखाली समिती
By जितेंद्र दखने | Published: July 20, 2023 07:07 PM2023-07-20T19:07:20+5:302023-07-20T19:08:24+5:30
अमरावती : आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजना २०२१-२२ अंतर्गत जिल्ह्यातील १४ तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे तालुकास्तरावर बाजी मारलेल्या ...
अमरावती : आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजना २०२१-२२ अंतर्गत जिल्ह्यातील १४ तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे तालुकास्तरावर बाजी मारलेल्या १४ गावांचे जिल्हास्तरीय समितीमार्फत ‘सुंदर गाव’ अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया १७ जुलैपासून सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या नेतृत्वात सात सदस्यीय समिती गावांची प्रत्यक्ष जाऊन पडताळणी करीत आहे."
राज्य सरकारच्या स्मार्ट ग्राम योजनेत जिल्हास्तरावर १४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार ‘आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव‘ योजनेंतर्गत २०२१-२२ मध्ये झालेल्या कामकाजाचे मूल्यमापन तसेच दस्तऐवजाची जिल्हास्तरीय समितीची तपासणीची मोहीम १७ ते २७ जुलैपर्यंत केली जाणार आहे. झेडपीचे सीईओ अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखालील समितीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, जिल्हा कृषी विकास अधिकारी गोपाळराव देशमुख, पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ गिरीश धायगुडे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप देशमुख, बांधकामचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे आदींचा सहभाग असलेली जिल्हास्तरीय समिती स्मार्ट ग्रामचे मूल्यमापन करीत आहेत. आमदार आदर्श ग्राम योजनेच्या धरतीवर राज्य सरकारने ग्रामीण भागासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेत तालुकास्तरावर चौदा व जिल्हास्तरावर एका गावाची स्मार्ट ग्राम म्हणून निवड केली जाते. तालुकास्तरावर निवड झालेल्या गावांना प्रत्येकी दहा लाख, तर जिल्हास्तरावरील गावास चाळीस लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते. या पारितोषिकाच्या रकमेतून गावात काय कामे करायची आहे, याच्या सूचना ग्रामविकास विभागाकडून दिल्या जातात. यंदा या योजनेत जिल्हास्तरावर १४ गावे निवडली असून जिल्हास्तरावरील पुरस्कारासाठी या गावात स्पर्धा निर्माण झाली आहे. तपासणी समितीकडून गावांतील विकासकामांची पाहणी केली जात आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावरील स्मार्ट गावाची निवड जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
अशी आहेत गावे
स्मार्ट ग्राम योजनेत पिंपयखुटा (ता. वरूड), लिहिदा (मोर्शी), देवरी (भातकुली), भारवाडी (तिवसा), बोरगाव धर्माळे (अमरावती), राजना (चांदूर रेल्वे), हिंगणगाव, (धामणगाव रेल्वे), पाळा (नांदगाव खंडेश्वर), नरदोडा (दर्यापूर), काळगव्हाण (अंजनगाव सुर्जी), तळवेल (चांदूर बाजार), मल्हारा (अचलपूर), झिल्पी (धारणीड), भुलोरी (चिखलदरा) या गावांचा समावेश आहे.