बारावी परीक्षांचे मूल्यांकन सुरू; मुख्याध्यापकांच्या नावे कस्टडीतून पेपर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:18 PM2020-02-28T18:18:15+5:302020-02-28T18:18:55+5:30

शिक्षण मंडळाकडे ११ मार्चपासून येणार तपासून 

Evaluation of XII examinations started; In the name of the Headmaster, the papers are sent from custody | बारावी परीक्षांचे मूल्यांकन सुरू; मुख्याध्यापकांच्या नावे कस्टडीतून पेपर रवाना

बारावी परीक्षांचे मूल्यांकन सुरू; मुख्याध्यापकांच्या नावे कस्टडीतून पेपर रवाना

Next

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागात इयत्ता बारावीच्या परीक्षांंचे मूल्यांकन युद्धस्तरावर सुरू आहे. शिक्षण मंडळाकडे हे पेपर ११ मार्चपासून गुणनियंत्रणाअंती येतील, अशी माहिती आहे.

इयत्ता बारावीच्या परीक्षांना १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. त्यानंतर वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, शिक्षण मंडळाच्या निर्णयानुसार जिल्हानिहाय कस्टडीतून थेट मुख्याध्यापकांच्या नावे हे पेपर पाठविले जात आहे. कस्टडीतून पेपर जाताना अत्यंत गोपनीय पद्धतीने बारकोड लावले जात आहे. सदर पेपर कोणत्या शाळा, महाविद्यालयातील आहेत, हे मुख्याध्यापक, शिक्षकांना कळू शकत नाही.

मूल्यांकनाची प्रक्रिया अतिशय गोपनीय आणि बारकोड प्रणालीद्वारे होत असल्याची माहिती आहे. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात मूल्यांकनानंतर ते पेपर गुणनियंत्रकांकडे पाठविले जातात. त्यानंतर गुणनियंत्रक हे पेपर पुढे गुणनियंत्रणासाठी पाठवितो. मूल्यांकनाचा असा प्रवास पूर्ण झाल्यानंतर ते पेपर निश्चित वेळापत्रकानुसार शिक्षण मंडळाकडे पाठविले जातात.

बारावी परीक्षांचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर वेळापत्रकानुसार ११ मार्चपासून शिक्षण मंडळाकडे पेपर पाठविणे बंधनकारक आहे. बारावीच्या परीक्षा  १८ मार्चपर्यंत चालणार आहे. अमरावती विभागात १ लाख ५१ हजार ३९२ परीक्षार्थींची नोंद झाली आहे. यात अकोला जिल्हा- २७३२१, अमरावती- ३०३०७, बुलडाणा- ३२५३४, यवतमाळ - ३३६८१, वाशीम- १९५४९ अशी विद्यार्थ्यांची संख्या आहे.
      
कस्टडीला पोलिसांचे सुरक्षा कवच

बारावी परीक्षांच्या मूल्यांकनासाठीच्या पेपरला पोलीस कस्टडीत ठेवण्यात येते. जिल्हानिहाय कस्टडी निर्माण केलेली असून, कोणते पेपर कोठे पाठवायचे, ही सर्व प्रणाली गोपनीय आहे. पोलीस सुरक्षा कस्टडी कक्षाला २४ तास राहत असल्यामुळे येथे कार्यरत कर्मचारीसुद्धा पोलीस निगराणीत कर्तव्य बजावतात, हे विशेष. 
    
पोलीस कस्टडीत असलेले पेपर हे अतिशय गोपनीय पद्धतीने मुख्याध्यापकांच्या नावे पाठविले जातात. विद्यार्थी, गाव, शाळा, जिल्हा, असा कोणताही उल्लेख मूल्यांकनदरम्यान परीक्षकांना दिसत नाही. वेळेत मूल्यांकनासाठी नियोजन केले आहे.
 - शरद गोसावी, अध्यक्ष, शिक्षण मंडळ, अमरावती विभाग

Web Title: Evaluation of XII examinations started; In the name of the Headmaster, the papers are sent from custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.