भूमिपूजनानंतरही पशुवैद्यकीय दवाखानाच्या बांधकामाला मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:13 AM2021-05-21T04:13:55+5:302021-05-21T04:13:55+5:30
जुनी इमारत शिकस्त, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात टाकरखेडा संभू : येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भूमिपूजनाला दोन महिने ...
जुनी इमारत शिकस्त, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात
टाकरखेडा संभू : येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भूमिपूजनाला दोन महिने उलटूनही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. पशुवैद्यकीय दवाखान्याची जुनी इमारत जीर्ण झाल्याने या दवाखान्याचे त्वरित नवीन बांधकाम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या बांधकामाला केव्हा मुहूर्त मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
टाकरखेडा संभू येथे पशुवैद्यकीय दवाखाना असून, परिसरातील पशुपालक येथे नियमित उपचाराकरिता गुरे घेऊन येतात. येथेच अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थानदेखील आहे, परंतु येथील इमारतीला ५० वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाल्याने ही इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे ही इमारत पाडून येथे नवीन इमारतीकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने ६५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. १३ मार्च रोजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. परंतु आज दोन महिने उलटून गेले असताना देखील येथील दवाखान्याच्या बांधकामाला साधी सुरुवातदेखील करण्यात आली नाही. मागील वर्षीच दवाखान्याच्या बांधकामाकरिता निधी मंजूर झाला आहे. कामाला सुरुवात होणे गरजेचे होते, याबाबत कंत्राटदाराला विचारणा करू, असे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश लावरे यांनी सांगितले.