स्पीकरवर पुकारल्यावरही थकबाकी न भरल्यास गल्लीचेच पाणी तोडणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 11:55 PM2024-03-14T23:55:35+5:302024-03-14T23:55:56+5:30
पाणीपट्टी थकबाकींची कोटीच्या कोटी उड्डाणे; सामान्यांकडे २१४ कोटी, तर शासकीय कार्यालयाकडे कोटींची देयके बाकी.
मनीष तसरे/ अमरावती : अमरावती शहर हे ‘ड’ वर्ग महापालिका असून सध्याची लोकसंख्या ही आठ लक्षपेक्षा जास्त आहे. शहरापासून ५५ किलोमीटर लांब असलेल्या मोर्शी येथील सिंभोरा अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयातून अमरावती व बडनेरा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करते. १९९४ मध्ये या जलवाहिनीची निर्मिती करण्यात आली होती ती आता जुनी झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ती वाहिनी अनेकदा फुटते. ती जलवाहिनी जुनी झाली असल्याने ती बदलण्याची गरज आहे. अमृत-२ योजनेंतर्गत ९८५.४९ काेटींच्या कामास शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून, त्यापैकी २९५.६४ काेटी हे मजिप्राला उभारायचे आहेत. ही रक्कम पाणीपट्टी करातून वसूल करण्याची हमी मजिप्राने घेतली आहे.
थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात झळकणार
पाणीपट्टी कर वसूल करण्याकरिता प्रशासनाने अनेक वेळा ध्वनिक्षेपकाव्दारे आवाहन करूनही अथवा नोटीस बजाहूनही जे ग्राहक पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करतात, अशा ग्राहकांचा अथवा संबंधित भागाचा संपूर्ण पाणीपुरवठा नाइलाजाने बंद करण्याचा निर्णय मजिप्राने सध्या घेतला आहे. ५० हजार ते १ लाख रुपयांपेक्षा पाणीपट्टी कर ज्यांच्याकडे बाकी आहे त्यांनी तो कर २० मार्चपर्यंत भरला नाही तर मजिप्रा अशांची नावे वृत्तपत्रांमध्ये झळकविणार आहे.
सद्य:स्थितीत शहरात एक लाखापेक्षा जास्त नळजाेडणीधारक आहेत. त्यापैकी ३५ टक्के ग्राहक हे नियमित पाणीपट्टीचा भरणा करतात. शहरात सध्या २१४ काेटी रुपयांची थकबाकी आहे. ग्राहकांना पाणीपट्टी भरणा करण्याकरिता मजिप्राद्वारे अनेक वेळा आवाहन करण्यात आले आहे.
- संजय लेवरकर, उपविभागीय अभियंता, मजिप्रा