एस.टी.कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरही हाल, म्हातारपणाची रक्कमही मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:13 AM2021-07-30T04:13:51+5:302021-07-30T04:13:51+5:30
कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण, सुट्ट्यांचे पैसे, एरिअर्ससाठी हेलपाटे अमरावती : सर्व सामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस.टी. महामंडळात ...
कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण, सुट्ट्यांचे पैसे, एरिअर्ससाठी हेलपाटे
अमरावती : सर्व सामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस.टी. महामंडळात ३० ते ३५ वर्षे सेवा दिल्यानंतरही महामंडळातील अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ वर्षोगिणती मिळत नसल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांची ससेहोलपट होत आहे.
राज्य परिवहन महामंडळात चालक, वाहक व अन्य पदावर काम करणारे अमरावती विभागात २ हजारांवर कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी अनेक कर्मचारी निवृत्ती वयोमानानुसार निवृत्त होतात. त्यांना सेवानिवृत्तीनंतर नियमानुसार ग्रॅज्युईटीची रक्कम, भविष्य निर्वाह निधी निवृत्ती दरम्यान जमा असलेल्या सुट्यांचे पैसे व करारातील एरिअर्सचा लाभ मिळतो. परंतु महामंडळाकडून निवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटीची रक्कम, पी.एफ निवृत्तीनंतर १ ते ३ महिन्याच्या आत मिळत असली तरी त्यांच्या हक्काचे शिल्लक सुट्ट्यांचे एरिअर्सची रक्कम १ ते दीड वर्षांनंतरही मिळाली नाही.
महामंडळाकडून केवळ अडीच हजार ते साडेतीन हजार रुपये नाममात्र काैटुंबिक पेेंशन मिळते. यावर कुटुंबाचा उतरनिर्वाह भागविणे कठीण आहे. महामंडळाकडून निवृत्तीनंतर कुठलीही पेंशन मिळत नाही. त्यामुळे हक्काच्या पैशाची गुंतवणूक करून त्यावर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून कुटुंबाचा गाडा चालवावा लागताे. मात्र, निवृत्त कर्मचाऱ्यांचे रजारोखिकरणाचा पैसा व एरिअर्स वेळेत मिळाणे गरजेचे आहे. त्याशिवाय म्हातारपणात कुठलाही आर्थिक आधार मिळू शकत नसल्याच्या भावना निवृत्त कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील आगार-०८
अधिकारी -३५
चालक -७८३
वाहक-८५२
कर्मचारी ७८६
कोट
नोकरीत असताना आणि निवृत्तीनंतरही फरकट
मी वाहन परिक्षक गत जून महिन्यात निवृत्त होवून १ वर्ष झाले. परंतु मला रजा रोखिकरणाची तसेच करारातील एरिअर्सची रक्कम अजूनही मिळाली नाही. कोरोनाकाळात आजार असताना उपचारासाठीही पैसे नव्हते. हक्काचा पैसा वेळेत मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे कठीण होत आहे.
- सुधाकर तिवाणे, निवृत्ती कर्मचारी
राज्य परिवहन महामंडळातून निवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ नियमानुसार १ ते ३ महिन्याच्या आत दिले जातात. त्यानुसार मला ग्रॅच्युईटीची रक्कम, पी.एफ फंड मिळाला आहे. निवृत्तीनंतर आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची पूर्तता झाल्यास देय असलेल्या लाभ वेळेवर मिळू शकतात. असा माझा अनुभव आहे.
- दीपक धानोरकर, निवृत्ती कर्मचारी
कोट
एस.टी.कर्मचारी संघटना
निवृत्त झाल्यानंतर एरिअर्सची रक्कम, भविष्य निर्वाहनिधी रक्कम दिली जाते. मात्र अनेक कर्मचाऱ्यांचे निवृत्ती नंतर शिल्लक असलेल्या रजा रोखीकरणानंतर त्याचा लाभ वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना काैटुंबिक, आजारपणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागते. त्यामुळे हे लाभ सुद्धा वेळेवर मिळावे.
- मोहित देशमुख, विभागीय सचिव, एस.टी.कामगार संघटना
कोट
विभाग नियंत्रक
महामंडळातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार पी.एफ., ग्रॅच्युईटीची रक्कम एका महिन्यात दिली जाते. त्यानुसार आतापर्यंत निवृत्त झालेल्या बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांना याचा लाभ दिला आहे. रजारोखीकरण, एरिअर्स संदर्भात आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यास याचाही लाभ वेळेवर देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.
- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक, एस.टी.महामंडळ