लाखोंचा खर्च करूनही गाव अंधारातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:50 PM2017-10-15T22:50:58+5:302017-10-15T22:51:24+5:30
तालुक्यातील काटकुंभ ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाने खरेदी केलेले एलईडी लाईट निकृष्ट दर्जाचे असून पाच लक्ष रूपये खर्च करूनही दोन महिन्यांतच बंद पडल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : तालुक्यातील काटकुंभ ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाने खरेदी केलेले एलईडी लाईट निकृष्ट दर्जाचे असून पाच लक्ष रूपये खर्च करूनही दोन महिन्यांतच बंद पडल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. गावकºयांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये गणल्या जाणाºया काटकुंभ ग्रामपंचायतीत तत्कालीन सचिव संजय दांदळे यांनी मे २०१७ मध्ये ग्रामपंचायतीला प्राप्त विविध निधीमधून दोन मोठे खांब मुख्य चौकात लावण्यासह काटकुंभ आणि अंतर्गत येणाºया रजणीकुंड येथे जवळपास ८० लहान पथदिवे लावण्यात आले होते. गावात मोठ्या प्रमाणात एलईडी पथदिवे लावण्यात आल्याने गावकºयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र त्यांचा तीन महिन्यांतच हिरमोड झाला.
पथदिवे बंद, गावात अंधार
ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या या एकूण ८२ पथदिव्यांपैकी मुख्य चौकातील दोन पथदिव्यांची खरेदी दोन लक्ष नव्वद हजार रुपयांची असून त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक पथदिवे बंद पडले आहेत, तर तीच स्थिती काटकुंभ आणि रजणीकुंड येथील लहान पथदिव्यांची आहे. तत्कालिन सचिव संजय दांदळे यांनी यात मोठा आर्थिक गैरव्यवहार करीत निकृष्ट दर्जाची खरेदी केल्याची तक्रार गावकºयांनी केली आहे. संबंधित सचिवाने एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी केलेले लाईट बंद पडल्यावर दुरूस्तीसाठी किंवा बदलवून देण्याचा करारनामा केला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात स्थानांतरित झालेल्या तत्कालीन सचिवाने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप पीयूष मालवीय, गणेश बडले, राजेश मालवीय, भुता बेठेकर, सचिन मालवीय, शिवा जैस्वाल आदींनी सादर तक्रारीतून केला आहे.
संबंधित एलईडी दुरूस्तीसाठी तत्कालिन सचिव संजय दांदळे यांनी एक भ्रमणध्वनी क्रमांक दिला होता. मात्र त्यावर संपर्क केला असता तीन महिन्यापूर्वी येण्याचे सांगितले. मात्र संबंधित आला नाही परिणामी काही लाईट बंद आहेत.
- बाळासाहेब ढोके
ग्रामसेवक, काटकुंभ.