पन्नाशी उलटली तरी मेळघाटात बदली; अग्निपरीक्षा घेताय का?
By जितेंद्र दखने | Published: May 8, 2023 09:25 PM2023-05-08T21:25:31+5:302023-05-08T21:27:17+5:30
सहाव्या टप्पा : प्रशासनाकडे मांडली बाजू
अमरावती : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या सहाव्या टप्प्यात मेळघाटात रवानगी केलेले ३०६ शिक्षक सध्या विविध कारणांमुळे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या शिक्षकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात प्रशासनाकडे लेखी स्वरूपात तक्रारी व गाऱ्हाणी मांडली आहेत. यावर प्रशासन आमची बाजू ऐकून घेत नसल्याची ओरड या शिक्षकांची आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांची बदली प्रक्रिया आटोपली असली तरी या प्रक्रियेत ३०६ शिक्षकांची मेळघाटमध्ये बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामधील बहुतांश शिक्षक हे ५२ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. यातील अनेकांनी यापूर्वी मेळघाटात सेवा दिलेली आहे. बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा हा चुकीच्या पद्धतीने राबविला गेला. या बदलीबाबत कुणाच्याही ध्यानीमनी नसताना ३०६ शिक्षकांची मेळघाटात बदली करण्यात आली. मात्र, आता आमची बाजू कुणीही समजून घेत नसल्याची ओरड या शिक्षकांची आहे. याशिवाय सुनावणीही घेतली जात नसल्याचे म्हणणे आहे. दरम्यान, शिक्षक विभागाकडे या बदल्यांसंदर्भात शिक्षकांनी आतापर्यंत २००च्या वर आपल्यावरील अन्याय दूर करण्याबाबत लेखी आक्षेप व तक्रारी तक्रार निवारण कक्षाकडे सादर केल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने निराकरण करण्यासाठी आता शिक्षण विभागाचे अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आमची प्रत्यक्ष सुनावणी घेऊन बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी देवेंद्र खैर, पंडित भोयर, देवेंद्र ढोक, सुजाता गजभिये, राजेश गजभिये व अन्य अन्यायग्रस्त शिक्षकांनी केली आहे.
तर सपाटीवरील शाळेत शिक्षक राहणार नाहीत
गैरआदिवासी भागातील म्हणजेच सपाटीवरील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ३०६ शिक्षकांना मेळघाटमध्ये बदलीवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सपाटीवरील शाळांमध्ये शिक्षकांचा अनुशेष मोठ्या प्रमाणात राहणार असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होणार आहे.