आज गाढवांनाही पुरणपोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:17 AM2021-09-06T04:17:15+5:302021-09-06T04:17:15+5:30
परतवाडा : बैल पोळ्याच्या दिवशी गाढवांचे औक्षण करून त्यांना पुरणपोळी भरविल्या जाणार आहे. अचलपूर तालुक्यासह जिल्ह्यात आगळ्यावेगळ्या पद्धतीने गाढवांच्या ...
परतवाडा : बैल पोळ्याच्या दिवशी गाढवांचे औक्षण करून त्यांना पुरणपोळी भरविल्या जाणार आहे. अचलपूर तालुक्यासह जिल्ह्यात आगळ्यावेगळ्या पद्धतीने गाढवांच्या श्रमाची पूजा करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आहे. वर्षभर मालकांसाठी राबणाऱ्या गाढवांप्रति यातून कृतज्ञता व्यक्त केली जाते. पोळ्याला शेतकरी जसे बैलांना महत्त्व देतात, अगदी त्याचप्रमाणे गाढवांना पशुपालकांकडून महत्त्व दिले जाते.
पोळ्याच्या दिवशी गाढवांना आंघोळ घातली जाते. आंघोळीनंतर वेगवेगळ्या रंगात त्यांना रंगविले जाते. गाढवे सुंदर दिसावीत म्हणून त्यांना कल्पकतेने रंगविण्याचा प्रयत्न केला जातो. रंगवलेल्या गाढवांच्या गळ्यात फुलांच्या माळा, मण्यांचे आणि घुंगराचे हार घातले जातात. जमेल ते अलंकार चढविले जातात. गाढवांसोबत राबणाऱ्या कार्यक्रमाला नवे कपडेही घेतले जातात. हे करीत असताना गाढव पाळणाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह बघायला मिळतो. तालुक्यातील पथ्रोट, रासेगाव, हरम, खानजमानगर, अचलपूर, परतवाडा येथे, तर चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड येथे आणि अंजनगावमध्येही वर्षानुवर्षे परंपरा जोपासल्या जात आहे. जिल्ह्याबाहेर अकोटलाही ही परंपरा आहे.
----------------
गाढवांचा पोळा
पथ्रोट येथील स्वरूपसिंग शाळेजवळ, परतवाडा येथील दयाल घाटवर आणि रासेगाव येथे दरवर्षी सार्वजनिकरीत्या गाढवांचा पोळा भरविला जातो. अकोटमध्येही हा पोळा भरतो. या पोळ्यात सजवलेली गाढव एका रांगेत तोरणाखाली उभी राहतात.
-----------
कोट
गाढवांवरच आमचे कुटुंब जगते. गाढवांचा पोळा हा आमच्याकरिता मोठा सण. बैल पोळ्याच्या दिवशी आम्ही गाढवांना आंघोळ घालतो. सजवतो. रंगवतो. त्यांची पूजा करतो. त्यांना पुरणपोळी खाऊ घालतो. या दिवशी गाढवांकडून कुठलेही काम आम्ही घेत नाही. त्यांना आराम देऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो.
- शंकरराव धारपवार, पथ्रोट
----------------
कोट
अचलपूरमध्ये हजारावर गाढव आहेत. अचलपूरमध्ये पोळा भरत नसला तरी बैल पोळ्याच्या दिवशी आम्ही त्यांना आंघोळ घालतो. रंगवतो. सजवतो. त्यांचे पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवतो.
- प्रदीप बावणे, अचलपूर.