पाऊस आला तरी उष्णतेची लाट कायम राहणार
By Admin | Published: March 27, 2016 12:03 AM2016-03-27T00:03:12+5:302016-03-27T00:03:12+5:30
बलुचिस्थानमधील उष्णवारे महाराष्ट्राकडे येत असल्यामुळे विदर्भासह अमरावती जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
हवामान तज्ज्ञांचा अंदाज : बलुचिस्थानातील उष्ण वारे महाराष्ट्राकडे
अमरावती : बलुचिस्थानमधील उष्णवारे महाराष्ट्राकडे येत असल्यामुळे विदर्भासह अमरावती जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दरम्यान रविवारी पावसाची शक्यता असतानाही उष्णतामानात विशेष बदल होणार नाही, असा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला आहे.
उन्हाळा सुरू झाल्यापासून हळूहळू तापमान उच्चांकाकडे वाटचाल करीत आहे. दरवर्षी साधारणत: एप्रिलपासून उन्ह्याची तीव्रता जाणवते. मात्र, यंदा मार्चमध्येच तापमानाने ४० डिग्री पार केल्यामुळे उन्ह्याचे चटके जाणवू लागले आहे. त्यातच दरम्यान वादळी पाऊस व गारपिटीमुळे तापमान कमी झाले होते. मात्र, त्यानंतर तापमानात चढउतार आढळून आला. आता उन्ह्याची तीव्रता हळुहळू पुन्हा वाढू लागली आहे. शुक्रवारी जल विज्ञान प्रकल्प कार्यालयाने ४०.६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद केली असून महिनाभरातील हे तापमान सर्वाधिक असल्याचे दिसून येते. मागील वर्षी तर ४७ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले होते. त्यामुळे यंदा उन्हाचा तडाखा जीवाची लाही-लाही करणार का, याची चिंता नागरिकांना लागली आहे. विदर्भात २७ व २८ मार्च रोजी पावसाची शक्यता आहे. पश्चिमी गडबड जम्मू-कश्मिरच्या दिशेने सरकत आहे. याच्याच प्रभावाने पाकिस्तान आणि राजस्थानवरील चक्राकार वारे बलुचिस्थानातील उष्णवारे राज्यस्थान, गुजरात व महाराष्ट्राकडे येत आहेत. त्यामुळे पाऊस आला तरी उष्णता कायम राहील, असे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.