अन् खाकीलाही फुटला माणुसकीचा पाझर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:12 AM2021-04-25T04:12:19+5:302021-04-25T04:12:19+5:30
वरूड : कोरोना काळात मृत्यूनंतर तिरडीला खांदा देण्यासाठी कुणी मिळत नाही. सांत्वन करणे तर दूरच राहिले. मात्र, याला ...
वरूड : कोरोना काळात मृत्यूनंतर तिरडीला खांदा देण्यासाठी कुणी मिळत नाही. सांत्वन करणे तर दूरच राहिले. मात्र, याला बेनोडा पोलीस अपवाद ठरले. पाच दिवसांपूर्वी अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख होऊ शकली नसल्याने शवविच्छेदनानंतर बेनोडा येथील पोलीस शिपाई सुभाष शिरभाते यांच्यातील खाकीलाही माणुसकीचा पाझर फुटला. त्यांनी केदारेश्वर मोक्षधामात अंत्यसंस्कार करून मानवतेचा परिचय दिला.
तालुक्यातील बेनोडा (शहीद) येथील प्रवाशी निवाऱ्यासमोर ६० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. ओळख पटविण्यासाठी जिल्ह्यासह राज्यातील पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. मृतदेह वरूडच्या ग्रामीण रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला होता. वाट पाहूनसुद्धा पाच दिवस कुणीच नातेवाईक आले नसल्याने अखेर खाकीला पाझर फुटला. येथीलच पोलीस शिपाई सुभाष शिरभाते यांनी ठाणेदार मिलिंद सरकटे यांचे मार्गदर्शनात अंत्यविधीला सहकारी म्हणून शहापूरच्या सुधाकर सलामे, विनोद रोहन, अमोल वाघमारे, संतोष रोहने यांच्या मदतीने वरूडच्या केदारेश्वर मोक्षधामात विधिवत अंत्यसंस्कार करून मानवतेचा परिचय दिला.