ताडोबा, टिपेश्र्वर अभयारण्याला पर्यटकांची पसंती; दऱ्या, खोऱ्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे पाठ
By गणेश वासनिक | Published: March 27, 2023 07:13 PM2023-03-27T19:13:56+5:302023-03-27T19:14:17+5:30
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असताना सुद्धा ताडोबा-अंधारीत वाघांना बघण्यासाठी पर्यटक वेटिंगवर असतात
अमरावती: राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असताना सुद्धा ताडोबा-अंधारीत वाघांना बघण्यासाठी पर्यटक वेटिंगवर असतात. मात्र महाराष्ट्रातील मेळघाट, सह्यांद्री व्याघ्र प्रकल्पाकङडे पर्यटक पाठ फिरवित आहे. वाघांची संख्या कमी असल्याचा अनुभव पर्यटकांना याठिकाणी मिळत असून दऱ्या, खोऱ्यांमुळे सुद्धा मेळघाटकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे वास्तव आहे. उन्हाळ्याचा हंगाम सुरु झाल्याने पर्यटकांची पाऊले जंगलाच्या दिशेने वळली आहे.
महाराष्ट्रात मेळघाट, ताडोबा, नवेगाव-नागझिरा, बोर, सह्याद्री, पेंच असे एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहे. यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प २५०० चौरस मीटर आणि सर्वात मोठा असताना मेळघाटात केवळ ५५ वाघांचे अस्तित्व दिसून येते. मात्र विदर्भातील पेंच, मेळघाट, बोर, नवेगाव बांध या राष्ट्रीय उद्यानाला मागे सोडत ताडोबा-अंधारीने उच्चांक गाठलेला आहे. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही लाखांवर पोहोचलेली असून या खोलाखाल टिपेश्वर अभयारण्यात केवळ १० वाघ असताना दुसऱ्या क्रमांकाची पसंती या टिपेश्वरला मिळत आहे. येथे १ जानेवारी ते २५ मार्च २०२३ पर्यंत ४० हजार तर ताडोबात एक लक्ष पर्यटकांना वाघ दिसल्याने या दोन जंगलाची चर्चा कमालीची वाढलेली आहे.
मेळघाट का मागे पडले
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार मोठा आहे. या व्याघ्र प्रकल्पाला मुख्य वनसंरक्षक दर्जाचा अधिकारी व ३५ वनपरिक्षेत्र असताना हवे तसेच पर्यटन या ठिकाणी होताना दिसून येत नाही. गेल्या १७ वर्षांपासून मेळघाटात केवळ ५५ ते ६० वाघांचे अस्तित्व टिकून आहे. कारण डोंगर, दऱ्या, खोऱ्यांचे हे जंगल वाघांच्या प्रजननासाठी अनुकुल नसल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगतात. वाघ दिसत नसल्याने मेळघाटात वर्षभरात केवळ २० ते २५ हजार पर्यटकांनी भेट दिलेली आहे, हे विशेष.
टिपेश्वर अभयारण्यात हमखास दिसतो वाघ
ताडोबानंतर सर्वाधिक पर्यटक खेचणारे टिपेश्वर अभयारण्य अत्यंत लहान आहे. मात्र याठिाकणी ताडोबातून ये-जा करणारे वाघ पर्यटकांना खुणावत आहे. केवळ १० वाघांच्या भरोशावर या अभयारण्याने मेळघाटला मागे साेडले आहे. या ठिकाणी लाखो पर्यटक भेटी देत आहेत. केवळ दोन प्रवेशद्वारावरुन पर्यटकांना आता शिरण्याची मुभा असून हमखास वाघ या ठिकाणी दिसत असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर महाराष्ट्राच्या तेलंगणा नकाशावर झळकत आहे.