पांढऱ्या सोन्यानेही केला शेतकऱ्यांचा घात

By admin | Published: November 22, 2015 12:18 AM2015-11-22T00:18:38+5:302015-11-22T00:18:38+5:30

वरुड तालुक्यात सततच्या नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहे. परंतु शेतीशिवाय पर्याय नसल्याने मिळेल तेथून कर्ज घेऊन परिवाराचा चरितार्थ चालवीत आहे.

Even the white gold did the killing of the farmers | पांढऱ्या सोन्यानेही केला शेतकऱ्यांचा घात

पांढऱ्या सोन्यानेही केला शेतकऱ्यांचा घात

Next

कवडीमोल भाव : वैदर्भीय शेतकऱ्यांवर 'बुरे दिन'
वरुड : वरुड तालुक्यात सततच्या नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहे. परंतु शेतीशिवाय पर्याय नसल्याने मिळेल तेथून कर्ज घेऊन परिवाराचा चरितार्थ चालवीत आहे. मंगळसूत्र गहाण ठेवून केलेल्या शेतीने दगा दिल्याने हिरवे स्वप्न भंगले आहे. कापसाला भाव नसल्याने उत्पादन खर्च काढणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.
वरुड तालुक्यात संत्रा, हळद, मिरची, कापूस, सोयाबीन ही पिके घेतली जातात. बागायती शेतीचा परिसर असल्याने सुखी समृध्द परिसर म्हणून परिचित आहे. परंतु सतत चार वर्षांपासून कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा एवढ्यावरच हा प्रकोप थांबला नाही. गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. बहुगुणी संत्राचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. हजारो टन संत्रा परप्रांतात निर्यात केला जातो. दिल्ली, मुंबई, कोलकता, उत्तरप्रदेश झारखंड, ग्वालीयर, आग्रा, मिझोराम सह नेपाळ, केरळ येथेही संत्रा पाठविला जातो. विदर्भातील बहुगुणी संत्राची चव देशासह विदेशातील लोकांनीसुध्दा चाखली आहे. निसर्गाच्या अवकृपेने सर्वकाही नेस्तनाबूत झाले. अज्ञात रोगाच्या तडाख्याने आंबिया बहराला गळती लागली. ५० टक्के संत्रा गळत आहे. तापमानाच फरक पडल्याने संत्रा पिवळी पडून गळती सुरु आहे. कुणी फंगस तर कुणी बुरशीमुळे गळती असल्याचे सांगत आहे.परंंतु कृषी विभागाकडून काहीही उपाययोजना केली जात नाही, ही शोकांतिका आहे. मृग नक्षत्राने दडी मारल्याने पिकांची पेरणी उशिरा झाली.
तब्बल एक महिना उशिरा कपाशी, मिरची, तूर, ज्वारी या पिकांची लागवड करण्यात आली. सोयाबीननेसुध्दा दगा दिल्याने दिवाळीच्या राशीसाठीसुध्दा सोयाबीन घरात आली नाही. सोयाबीन उत्पादनात कमालीची घट झाल्याने सोयाबीन उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसला. संत्रा आंबिया बहरसुध्दा गळाल्याने ५० ते ६० टक्के संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले. मृग बहर आलाच नाही. यामुळे संत्रा उत्पादकांनासुध्दा मोठा फटका बसला. कपाशी, मिरचीचे पीकसुध्दा बुडाले, मिरचीवर कोकड्या रोगासह अज्ञात रोगाच्या आक्रमणामुळे शेकडो हेक्टर जमिनीतील मिरचीचे पीक बुडाले. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका मिरची उत्पादकांना बसला. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी पत्नीच्या गळयातील मंगळसूत्र गहाण ठेवून कशीबशी शेती केली. तरीसुध्दा अखेर शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगले. तर पुन्हा कर्जाचा डोंगर डोक्यावर उभा ठाकला आहे. यामुळे येणाऱ्या मार्चमध्ये कर्जाचा भरणा कसा करावा की, शेती गहाणामध्ये जाऊ द्यायच्या हा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे.
शिक्षण आणि मुलींचे विवाह करण्याचा प्रश्न निर्माण होऊन शेतकरी त्रस्त झाला आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि नेत्याच्या दुर्लक्षामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Even the white gold did the killing of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.