यंदाही बाराखडी, अन् पाढे ऑनलाईनच...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:10 AM2021-06-06T04:10:15+5:302021-06-06T04:10:15+5:30
अमरावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेत शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले. शिक्षणाचे प्राथमिक धडे शिक्षकांना ऑनलाइन गिरवावे लागले. वर्ष सरता सरता ...
अमरावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेत शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले. शिक्षणाचे प्राथमिक धडे शिक्षकांना ऑनलाइन गिरवावे लागले. वर्ष सरता सरता दुसरी लाट आली आणि प्राथमिक शिक्षणाचा पाया असण्याची पद्धत दुरापास्त झाली. आगामी कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे. त्यामुळे शाळा सुरू होणे जवळपास अशक्य मानले जात आहे.
जिल्ह्यात रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतच आहे. १५ जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा ऑनलाइनच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अनलॉकच्या तयारीत शासन असले तरी अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन असेल. तेथील शाळा उघडल्या नाही तर शिक्षण यंदाही घरात बसूनच घ्यावे लागणार आहे. तिसरी लाट लहान मुलांवर येण्याची आरोग्य विभागाची माहिती असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळाही बंद होत्या. ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, या माध्यमाचे शिक्षण विद्यार्थी, पालक व शिक्षकांना कंटाळवाणे झाले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मात्र, तरीही पुन्हा ऑनलाइन शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या विद्या प्राधिकरणद्वारा ऑनलाईन शिक्षणात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. युट्युब, दूरदर्शन, दीक्षा ॲप, स्वाध्यायासह विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले होते. शाळा बंद पण शिक्षण सुरू, या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध केले होते. यातून बहुसंख्य विद्यार्थ्यांना लाभ झाला. यंदाही गतवर्षीपेक्षा अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.
शाळकरी मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सन २०२१-२२ मधील शैक्षणिक वर्ष २६ जून पासून सुरू होणार होती. मात्र, या वर्षात प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाऊ नये म्हणून विद्या प्राधिकरणाच्यावतीने ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
बॉक्स
शाळेचा शंभर टक्के निकाल
गतवर्षी पाचवी ते आठवी प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ग सुरू न झालेल्या जिल्हा परिषदेच्या दीड हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूणच लाखो विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेशित झाले आहेत.