अखेर चंद्रभागा प्रकल्पाचे तीनही दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:12 AM2021-07-25T04:12:20+5:302021-07-25T04:12:20+5:30
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, सपन, चंद्रभागा, शहानूर नद्या प्रवाहितपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा नदीवरील चंद्रभागा प्रकल्पाचे तीनही दरवाजे शनिवारी ...
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, सपन, चंद्रभागा, शहानूर नद्या प्रवाहितपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा नदीवरील चंद्रभागा प्रकल्पाचे तीनही दरवाजे शनिवारी दुपारी १ वाजता दहा सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत.
चंद्रभागा प्रकल्प ७०.१७ टक्के भरला आहे. प्रकल्पाचे तीनही दरवाजे उघडले गेल्यामुळे धरणातून नदीपात्रात २१.५५ घनमीटर प्रतिसेकंद इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शनिवारी चंद्रभागा धरणावर सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या धरण क्षेत्रातील मोझरी पर्जन्यमान केंद्रावर तीन मिलिमीटर, तेलखार पर्जन्यमान केंद्रावर १२ मिलिमीटर, तर चिखलदरा पर्जन्यमान केंद्रावर ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या प्रकल्पावर शाखा अभियंता ओमकार पाटील लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या नियंत्रणातच धरणाचे तीनही दरवाजे उघडण्यात आले आहेत. हे दरवाजे उघडण्याआधीच शुक्रवारी चंद्रभागा प्रकल्पाच्यावतीने लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. परतवाडाचे ठाणेदार सदानंद मानकर यांनीही समाज माध्यमांवर सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अचलपूर तालुक्यातील शहानूर आणि सपन प्रकल्पाची चारही दारे २२ जुलैलाच उघडण्यात आली आहेत. या प्रकल्पांसोबतच चंद्रभागा प्रकल्पाचेही दरवाजे उघडण्याच्या प्रतीक्षेत होते. २४ जुलैला ते उघडले गेले.
मासोळ्या आणि खेकडे
अचलपूर तालुक्यातील शहानूर, सपन आणि चंद्रभागा प्रकल्पात मोठ्या मासोळ्या आणि खेकड्यांची पिलावळ विकसित झाली आहेत. या तिन्ही धरणांची सर्व दारे उघडल्या गेल्यामुळे सपन, चंद्रभागा आणि शहानूर या तिन्ही नद्या वाहू लागल्या आहेत. या वाहत्या पाण्याबरोबर धरणातील मासोळ्या आणि खेकडे धरणाबाहेर पडत आहेत. नदीपात्रात आढळून येणाऱ्या मासोळ्या आणि खेकड्यांची पिलावळ गावकऱ्यांकरिता पर्वणी ठरत आहेत. मोठ्या मासोळ्या पकडण्यात अनेक जण गुंतले आहेत.