अखेर श्वानसेवन प्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 11:03 PM2017-08-06T23:03:30+5:302017-08-06T23:04:26+5:30
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांनी फस्त केलेल्या श्वानाचे मोलच काय,
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांनी फस्त केलेल्या श्वानाचे मोलच काय, अशी उलट विचारणा करणाºया राजापेठ पोलिसांनी अखेर आठवड्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. 'विद्यार्जन अन् श्वानसेवन' या वृत्तमालिकेतून 'लोकमत'ने हा किळसवाणा आणि गंभीर प्रकार लोकदरबारी मांडल्यानंतर राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध का होईना, फौजदारी नोंदवून घेतली आहे.
एचव्हीपीएमलगतच्या श्रीनाथवाडीतील हनुमान रंगराव शेळके यांचा पाळीव कुत्रा २९ जुलैला सकाळी ११ वाजताच्या सुमारास बेपत्ता झाला. शेळकेंनी परिसरात श्वानाची शोधाशोध चालविली. ३१ जुलैला सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्यांना त्यांच्या पाळीव श्वानाचे अवशेष हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृह परिसरात आढळून आले.
आपल्या पाळीव श्वानाला परप्रांतीय विद्यार्थ्यांनी कापून फस्त केल्याची शंका हनुमान शेळकेंना आली. त्यांनी या घटनेची तक्रार १ आॅगस्टला राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली. परप्रांतीय विद्यार्थ्यांनी चक्क श्वान कापून खाल्याच्या घटनेने जिल्ह्याभरात खळबळ उडाली. मात्र, राजापेठ पोलिसांनी चौकशीच्या नावावर शेळकेंची उलटतपासणी केली. वसतिगृहात श्वान कापून खाल्याचे लक्षणे आढळली नाही, श्वानाला कापताना कोणी पाहिलेच नाही आणि त्या श्वानाचे मोलच काय, असा सवाल राजापेठचे ठाणेदार रामराव खराटे यांनी केला होता. खराटेचा हा अजब तर्क 'लोकमत'ने लोकदरबारी मांडले. त्यामुळे घटनेचे गांभीर्य उघड झाले. अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांना भारतीय दंड विधानच्या कलम ४२९ अन्वये गुन्हा दाखल करावा लागला.
साक्षीदारांचे बयान
श्वान शिकार प्रकरणात रविवारी ठाणेदार सूर्यवंशी यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील वसतिगृहात जाऊन संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली. पोलिसांनी श्रीनाथवाडीतील काही साक्षीदारांचे बयान नोंदविले.
अशी आहे कलम ४२९
प्राण्याला दुखापत करून अपंग करणे अथवा अविचाराने त्याला ठार मारून पशुपालकाचे नुकसान करणाºयाविरुद्ध भादंविचे कलम ४२९ अन्वये गुन्हा नोंदविला जातो. यात ५ वर्षे शिक्षेची तरतूद आहे.
'त्या' श्वानाची किंमत एक हजार रुपये
श्वानाची महापालिकेत नोंद नसल्याचे व श्वानाला किंमत नसल्याने गुन्हा दाखल होणार नाही, असे खराटे म्हणाले होते. तथापि ठाणेदार किशोर सुर्यवंशी यांच्या आदेशान्वये रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला व त्यात श्वानाची किंमत १ हजार रुपये दाखविण्यात आली.
शेळकेंच्या तक्रारीची संपूर्ण शहानिशा केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेत.
- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ.