अखेर जिल्हा दुष्काळग्रस्त
By admin | Published: January 1, 2016 12:37 AM2016-01-01T00:37:14+5:302016-01-01T00:37:14+5:30
यंदाच्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ४३ पैसे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. १ हजार ९६७ गावांत ५० पैशांच्या आत
गजानन मोहोड ल्ल अमरावती
यंदाच्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ४३ पैसे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. १ हजार ९६७ गावांत ५० पैशांच्या आत पैसेवारी असल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त असण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले. याविषयी शासनाच्या घोषणेची औपचारिकता बाकी राहिली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व गावांना शासनाच्या सोई-सवलती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात पेरणीपासून पावसांची दडी, व नंतर पावसात खंड यामुळे जिल्ह्यातील ३ लाख १९ हजार ९९५ हेक्टरमधील सोयाबीन उद्ध्वस्त झाले. क्विंटल ऐवजी किलोमध्ये उतारी आली. शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत असताना शासनाने १६ सप्टेंबरच्या आदेशान्वये ६५ पैशांपेक्षा कमी व अधिक या निकषा नुसार जिल्ह्यात ५९ पैसे ही पैसेवारी १८ सप्टेंबरला घोषित केली होती. ही दुष्काळजन्य स्थिती गृहीत धरण्यात आली. मात्र एकाच आठवड्यात शासनाने निर्णय फिरविला. २३ सप्टेंबरला सुधारित निकष मागे घेऊन प्रचलीत ५० पैशांपेक्षा कमी किंवा अधिक अशी पैसेवारी घोषित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर जिल्ह्यात खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ३२ आॅक्टोबरला ४६ पैसे जाहीर करण्यात आली. यामध्ये अमरावती तालुका ३७ पैसे, भातकुली ४४, नांदगाव खंडेश्वर ४९, चांदूररेल्वे ४५, धामणगाव ४७, तिवसा ४३, मोर्शी ४८, वरुड ४९, अचलपूर ४७, चांदूरबाजार ४७, दर्यापूर ४८, अंजनगाव ४७, धारणी ४२ व चिखलदरा तालुक्यात ४५ पैसे ही पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान ३ आॅक्टोबर रोजी शासनाने पैसेवारी काढण्याविषयी सर्वसमावेशक निर्णय घेतला. त्या अनुषंगाने यंदाच्या खरीप पिकांची अंतिम पैसेवारी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. ही ५० पैशांच्या आत असल्याने जिल्ह्यात दुष्काळस्थिती असल्याविषयी शिक्कामोर्तब झाले आहे.
या सवलती मिळणार
४जमीन महसुलात सूट
४सहकारी कर्जाचे पुर्नगठन
४शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
४कृषी पंपाच्या चालू बिलात ३३.५ टक्के इतकी सूट
४शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी
४रोहयोअंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
४आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर
४शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.
शासनाने यापूर्वी जाहीर केलेले दुष्काळग्रस्त जिल्हे हे कमी पाऊस या निकषावर आधारित होते. त्या तुलनेत जिल्ह्यात पाऊस ८० ते ९० टक्के होता. मात्र खरीप पिकांची सुधारित आणि अतिम पैसेवारी ही ५० पैशाच्या आत आल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासन लवकरच निर्णय घेणार आहे.
- किरण गित्ते, जिल्हाधिकारी.
महसूलमंत्र्यांना कधी येणार जाग ?
४राज्यातील दुष्काळग्रस्त काही जिल्ह्यांची यादी आॅक्टोबर अखेरीस महसूल मंत्र्यांनी जाहीर केली होती. तसेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ना. एकनाथ खडसे यांनी राज्यातील उर्वरित काही दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची यादी घोषित करण्यात येईल, अशी घोषणा अकोला येथे माध्यमांशी बोलताना केली होती. मात्र डिसेंबरअखेर झाला असतानाही महसूल मंत्र्यांनी याविषयी घोषणा केलेली नाही. आता जिल्ह्यासह विभागातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने महसूलमंत्री जिल्हा दुष्काळाची केव्हा घोषणा करणार, असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.