अखेर रामपुरी कॅम्पमधील दारू विक्रीचे दुकान पाडणार
By admin | Published: November 25, 2015 12:54 AM2015-11-25T00:54:04+5:302015-11-25T00:54:04+5:30
स्थानिक रामपुरी कॅम्प परिसरात उद्याननजिक अतिक्रमित जागेवर असलेले देशी दारू विक्रीचे दुकान जमीनदोस्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
अवैध बांधकाम सिद्ध : महापालिका आयुक्तांचे आदेश, लवकरच जमीनदोस्त होणार
अमरावती : स्थानिक रामपुरी कॅम्प परिसरात उद्याननजिक अतिक्रमित जागेवर असलेले देशी दारू विक्रीचे दुकान जमीनदोस्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सदर दुकानाचे बांधकाम अवैध असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार हे दुकान जमिनदोस्त केले जाणार आहे.
रामपुरी कॅम्प येथील देशी दारू विक्रीचे दुकान कायम हद्दपार करण्यात यावे, ही मागणी महिलांनी पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार सुनील देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, एक्साईज अधीक्षक उषा वर्मा रेटून धरली होती. देशी दारू विक्रीचे दुकान हे अतिक्रमित जागेवर असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत आयुक्त गुडेवार यांनी याप्रकरणी सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्याक डे चौकशीची जबाबदारी सोपविली होती. त्यानुसार जागेचे मूळ कागदपत्रे, मागविण्यासाठी नोटिस बजावली होती. मात्र १५ दिवसांचा कालावधी लोटला असताना या दुकान मालकाने कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे हे प्रकरण आयुक्तांच्या दरबारात नेण्यात आले. या दुकानाचे बांधकाम अवैध असल्यामुळे ते जमीनदोस्त करण्याचा निर्णय आयुक्त गुडेवार यांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)