धक्कादायक! 'दरदिवशी 67 लाख पोहोचतात ‘मातोश्री’वर'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 09:03 PM2019-08-26T21:03:50+5:302019-08-26T21:15:41+5:30
एसटी प्रवासी विम्याचे दरदिवसाला ६७ लाख रुपये ‘मातोश्री’वर पोहोचविले जातात.
अमरावती : राज्य शासनाने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेल्या एसटी प्रवासी विम्याचे दरदिवसाला ६७ लाख रुपये ‘मातोश्री’वर पोहोचविले जातात. परिवहन विभागाला प्रवासी दरदिवशी जो विम्याचा एक रुपया देतो, तीच ही रक्कम आहे. शेतक-यांचा कैवार घेणारे दिवाकर रावते आता प्रवाशांची लूट करीत आहेत, असा घणाघात महापर्दाफाश यात्रेचे प्रमुख नाना पटोले यांनी केला. हे सरकार साफ करण्यासाठी काँग्रेसने महापर्दाफाश यात्रेला सुरुवात केल्याचे पटोले म्हणाले.
अमरावतीतून सोमवारी महापर्दाफाश यात्रेला प्रारंभ झाला. नाना पटोले यांनी यात्रा काढण्यामागील भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री फडणवीस यांचा एक्सिस बँक आणि अर्थमंत्री मुनगंटीवार यांचा तिरुपती देवस्थानच्या माध्यमातून ‘डबल’ विकास झाला आहे. महाजनादेश यात्रेद्वारे मुख्यमंत्र्यांनी विकासकामांचा देखावा केला, त्याचा जनतेच्या दरबारात महापर्दाफाश केला जाणार आहे.
महाजनादेश यात्रेला लागणारा पैसा हा शासनतिजोरीत लुटला जात आहे. मुख्यमंत्री जनतेच्या पैशांतून भाजपचा प्रचार करीत आहेत, असे पटोले म्हणाले. यावेळी आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री नितीन राऊत, आशिष दुआ, आमदार वजाहत मिर्झा, माजी आमदार आशिष देशमुख, रवींद्र दरेकर, प्रकाश देवतळे, मोहन जोशी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे शहाराध्यक्ष किशोर बोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, चारूलता टोकस, महापालिका विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, विलास इंगोले, प्रकाश साबळे, केवलराव काळे, नरेशचंद्र ठाकरे, जयंत देशमुख आदी उपस्थित होते.
------------
१७ बळींसाठी मुख्यमंत्री जबाबदार
राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज आहे. सांगली, कोल्हापूर पुरात असताना मुख्यमंत्री यात्रेत मग्न होते. बोट उलटून १७ जणांचे बळी गेले; त्यास मुख्यमंत्री जबाबदार आहेत. राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन आल्यास सहा महिन्यांच्या आत शेतक-यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याप्रसंगी मांडली. त्यांच्या या भूमिकेला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत यांनी आदींनी दुजोरा दिला.
------------
मंत्रिमंडळातून शेतकरीपुत्र गायब
राज्याच्या मंत्रिमंडळातून शेतकरीपुत्र गायब झाले असून, त्याऐवजी भांडवलदारांचे प्रतिनिधी मंत्री म्हणून राज्याचा कारभार हाकत असल्याचा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला. शेतक-यांची कर्जमाफी फसवी आहे. विम्याचे पैसे हे शेतक-यांच्या नव्हे, तर भांडवलदाराच्या खिशात जात आहेत. आर्थिक मंदी ही शासनाची देण असून, येत्या काळात वस्त्रोद्योग पूर्णपणे डबघाईस येणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. जलयुक्त शिवार योजनेतून पाणी नव्हे, तर पैसा जिरल्याचा आरोप थोरात यांनी केला.
-------
सत्ता आल्यास सरकसकट कर्जमाफी-थोरात
राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन आल्यास सहा महिन्यांच्या आत शेतक-यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेला महापर्दाफाश यात्रेचे प्रमुख नाना पटोले, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत आदींनी दुजोरा दिला.