दररोज एक दलघमी पाण्याचे बाष्पीभवन
By admin | Published: March 23, 2016 12:22 AM2016-03-23T00:22:35+5:302016-03-23T00:22:35+5:30
यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुख्य, मध्यम व लघु असे एकूण ८० प्रकल्पातील ....
जिल्ह्यात ८० प्रकल्प : एका आठवड्यात १४ दलघमीने पातळीत घट
गजानन मोहोड अमरावती
यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुख्य, मध्यम व लघु असे एकूण ८० प्रकल्पातील जलसाठ्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. एका आठवड्यात या प्रकल्पांची सरासरी पातळी १४ दलघमीने कमी झाली आहे. प्रकल्पांमधून पाण्याचा जितका वापर होतो, त्याच्या सहापटीने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. उन्हाची दाहकता अशीच राहिल्यास लवकरच जलसाठा धोक्याची पातळी गाठण्याची भीती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात उर्ध्व वर्धा हा एकमेव मुख्य प्रकल्प आहे. या व्यतिरीक्त शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सापन हे चार मध्यम व ७५ मध्यम प्रकल्प आहेत. १० मार्च रोजी यासर्व ८० प्रकल्पांत ८९२.७७ इतक्या पूर्ण क्षमतेच्या तुलनेत ३०९.६० दलघमी जलसाठा उपलब्ध होता. ही टक्केवारी ३४.६८ इतकी होती. १७ मे रोजी जलसंपदा विभागाव्दारा उपलब्ध पाणीसाठ्याच्या गोषवाऱ्यानुसार या सर्व प्रकल्पांत २९३.०४ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाण्याची टक्केवारी ३२.८२ इतकी आहे. म्हणजेच एका आठवड्यात या सर्व प्रकल्पांचा जलसाठा १४.०३ दलघमीने कमी झाला आहे. १.८६ ने टक्केवारी कमी झाली आहे. सिंचन, औद्योगिक व पाणीपुरवठा योजनेसाठी पाण्याचा वापर दररोज एक दलघमी गृहित धरल्यास उन्हाच्या दाहकतेमुळे किमान एक दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
जिल्ह्यात ८० प्रकल्पांत जितका जलसाठा शिल्लक आहे, त्यातुलनेत ७० टक्के साठा उर्ध्व प्रकल्पात असून या प्रकल्पात दोन आठवड्यांपूर्वी १८३.२३ व मागील आठवड्यात १८०.१४ दलघमी जलसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत या आठवड्यात १७२.४९ दलघमी जलसाठा शिल्लक आहे.
एका आठवड्यात ८.६५ दलघमीने पाण्याची पातळी कमी झाली आहे. धरणात सद्यस्थितीत ३०.५८ टक्के साठा आहे. यातील गाळ व मृतसाठा १० टक्के गृहित धरल्यास प्रकल्पात केवळ २० टक्केच जलसाठा आहे. जलसाठ्यातील पाण्याचे नियोजन नसल्यास उन्हाळ्याच्या पार्श्वभूमिवर ही धोक्याची घंटा आहे.
साठवण परिसराची खोली अधिक हवी
धरणाचे पाणीसाठवण क्षेत्र जितके पसरट तेवढेच बाष्पीभवन अधिक होते. त्यामुळे हे क्षेत्र अधिकाअधिक असावयास हवे. याउपरही बाष्पीभवन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. सध्यातरी जलसंपदा विभागाकडे बाष्पीभवन थांबविण्यासाठी सक्षम पर्याय नसल्याचे या विभागाने सांगितले.
बाष्पीभवन थांबविणे शक्य पण महागडे
धरणाचे पाणीसाठवण क्षेत्र पसरट बशीच्या आकाराचे असते. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेमुळे झपाट्याने बाष्पीभवन होते. हे थांबविण्यासाठी पाण्यावर केमिकल पसरविले जाते. त्यामुळे सूर्यकिरणांचा पाण्याशी थेट संपर्क होत नाही. परंतु ही प्रक्रिया खूप महागडी आहे, असे जलसंपदाच्या अभियंत्यांनी सांगितले.