रोजच प्राणाशी गाठ, नदीपात्रातून काढावी लागते वाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:27+5:302021-07-04T04:09:27+5:30
शेतकरी, शेतमजूर त्रस्त : तळेगाव दशासर : घुईखेड मार्गावरील सोसायटीनजीक असलेल्या मोती कोळसा नदीवर पूल नसल्याने शेतकरी, शेतमजूर व ...
शेतकरी, शेतमजूर त्रस्त :
तळेगाव दशासर : घुईखेड मार्गावरील सोसायटीनजीक असलेल्या मोती कोळसा नदीवर पूल नसल्याने शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांना तारेवरची कसरत करीत पात्रातून वाट काढावी लागत आहे.
बेंबळा प्रकल्पाच्या बॅक वाॅटरमुळे मोती कोळसा नदीच्या पाण्याची पातळी वाढली असल्याने येथील ग्रामस्थांना नदीतून मार्गक्रमण करून शेतीची कामे करावी लागत आहेत. या मार्गावर तळेगाववासीयांचे हजारो हेक्टर शेती आहे आणि हाच एकमेव नजीकचा रस्ता आहे. त्याऐवजी शेतात जायचे असल्यास महामार्गाने तीन किमी अंतर कापून ये-जा करावी लागते. रस्त्यासाठी शेतकरी व शेतमजुरांनी २४ सप्टेंबर २०१९ रोजी बेंबळा प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तत्कालीन आमदार वीरेंद्र जगताप यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्यांनी जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याची सूचना बेंबळा प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. परंतु, अद्यापही याबाबत शासन-प्रशासनाने पाऊल न उचलल्याने शेतकऱ्याचा असंतोष वाढला आहे. शेकडो शेतकरी व शेतमजुरांसह या विषयात बेमुदत उपोषण करणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
यवतमाळवरून येणाऱ्यांना कारंजा-औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवेवर जाण्याकरिता सोयीस्कर असल्याने वाहनचालक या मार्गाचा अवलंब करतात. उन्हाळ्याच्या दिवसांत रेती तस्करांनी रेतीचा अवैध उपसा केल्याने त्या ठिकाणी मोठं -मोठे खड्डे पडले असल्याने ये-जा करणाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या नदीवर पूल बांधावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.