देशातील प्रत्येक जिल्हा होणार पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2022 08:45 AM2022-06-19T08:45:00+5:302022-06-19T08:45:01+5:30
Amravati News केंद्र सरकारने अमृत सरोवर योजनेतून देशातील २८ राज्ये पाणीदार करण्याचा संकल्प सोडला आहे. या याेजनेतून मृतप्राय तलावांना पुनर्जिवीत करणे अथवा नवीन जलाशय निर्माण करण्यात येणार आहेत.
गणेश वासनिक
अमरावती : ब्रिटीशकालीन तलाव, जलाशय हे नियोजनाअभावी मृतप्राय झाले आहेत. परिणामी अलीकडे गाव, खेड्यात पाण्याचे भीषण दुर्भीक्ष्य जाणवू लागले आहे. मात्र, आता केंद्र सरकारने अमृत सरोवर योजनेतून देशातील २८ राज्ये पाणीदार करण्याचा संकल्प सोडला आहे. या याेजनेतून मृतप्राय तलावांना पुनर्जिवीत करणे अथवा नवीन जलाशय निर्माण करण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारच्या जल, वायू प्रदूषण विभागाने प्रत्येक जिल्हा पाणीदार होण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरु केले आहे. त्या अनुषंगाने ब्रिटीशकालीन मृतप्राय तलाव अथवा जलाशय पुनर्जिवीत करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याबाबतचे पत्र जारी केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून प्रत्येक जिल्ह्यात ७५ तलाव साकारले जाणार आहेत. यात वन विभाग, जल संधारण, कृषी, ग्रामविकास, सिंचन, महसूल विभागाला ब्रिटीशकालीन तलाव, जलाशये शोधावी लागणार आहेत. गावाशेजारी असलेले जलाशय, तलाव पुनर्जिवीत करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, ज्या ठिकाणी मृतप्राय तलाव अथवा जलाशय नसेल तेथे आवश्यकतेनुसार नव्याने साकारले जाणार आहे.
७७३ जिल्ह्यात साकारणार ५७ हजार ९७५ तलाव
देशातील २८ राज्ये पाणीदार करण्यासाठीचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार अमृत योजनेतून ७७३ जिल्ह्यात ५७,९७५ तलाव, जलाशय साकारले जाणार आहेत. राज्य शासनाकडून तसे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्राप्त प्रस्तावानुसार केंद्र सरकार राज्यांना अंदाजपत्रकानुसार निधी वितरित करणार असल्याचे केंद्र सरकारच्या जल, वायू प्रदूषण विभागाच्या पत्रात नमूद आहे.
बोअरवेलची स्पर्धा, पाण्याची पातळी गेली खोल
एकिकडे मृतप्राय तलाव, जलाशय नियोजनाअभावी मृतप्राय झाले आहेत. तर दुसरीकडे शहर, ग्रामीण भागात बोअरवेल करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. बोअरवेल करताना जमिनीत छिद्र करण्यासाठी २०० फुटांची नियमावली आहे. मात्र, अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खोल गेल्याने ४०० ते ५०० फुटांपर्यंत बोअरवेल करण्यात येत आहेत. जमीन आतून ठिसूळ झाली आहे. अशा भागात भूर्गभाची खोली वाढत गेल्याने भूकंपाची दाट शक्यता असल्याचे भूगर्भ शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
तलावातील गाळ शेतकऱ्यांना देणार
ब्रिटिशकालीन तलाव अथवा जलाशय पुनर्जीवित करताना गाळ काढण्यात येणार आहे. तलावातून निघणारा गाळ शेतीसाठी दिला जाईल. तलावाचा उपसा करून पाणीसाठा वाढविण्यावर भर असेल. गाव, शहरानजीक असलेल्या तलाव व जलाशयातून भविष्यात पाणीपुरवठा करण्याचे नियाेजन आहे. भूर्गभात पाण्याची पातळी वाढावी, हेच अमृत सरोवर योजनेचे फलित असेल.
केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून प्रत्येक जिल्ह्यात ७५ तलाव, जलाशय साकारण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात अशा स्थळांचे मॅपिंग सुरू आहे. ऑनलाईन पोर्टलवर छायाचित्र अपलोड केले जात आहे. पंचायत समिती स्तरावर ही कामे सुरू आहेत. जलसंधारण, नरेगाअंतर्गत तलाव, जलाशय पुनर्जीवित केले जातील. आतापर्यंत ७६ छायाचित्र अपलोड झाली आहेत.
- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती