नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने झाडे लावावी
By admin | Published: June 6, 2016 12:17 AM2016-06-06T00:17:48+5:302016-06-06T00:17:48+5:30
पर्यावरणाच्या रक्षणासाठी अधिकाधिक झाडे लावण्याची गरज आहे.
पालकमंत्री : जागतिक पर्यावरण दिन उत्साहात
अमरावती : पर्यावरणाच्या रक्षणासाठी अधिकाधिक झाडे लावण्याची गरज आहे. यासाठी आपापली जबाबदारी ओळखून समाजातील प्रत्येक नागरिकाने अधिकाधिक झाडे लावावीत व त्यांचे संगोपन, संवर्धन करावे, असे आवाहन पर्यावरण राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिन आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवारी वलगाव तालुक्यातील नया अकोला येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सुरूवातीला अकोला ग्रामपंचायतीच्या परिसरात व मंदिराच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपजिल्हाधिकारी काळे, सामाजिक वनिकरणाचे उपसंचालक पी.डी. मसराम, सहायक संचालक थोरात, तहसीलदार सुरेश बगळे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, गटविकास अधिकारी कापडे, तलाठी कपीले, पंचायत समिती सभापती आशिष धर्माळे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले, येत्या १ जुलै रोजी राज्यात दोन कोटी वृक्ष लावण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. जिल्ह्यात १० कोटी झाडे लावण्याचा मानस आहे.गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी एमआरजीएसच्या माध्यमातून गटांची निर्मिती करून गावात व शेतातील बंधाऱ्यांवर दीर्घकाळ टीकणारी झाडे लावावीत. राज्यात ३ ते ९ जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येतो. या सप्ताहात जिल्ह्यात सुमारे १० कोटी झाडे लावली जातील. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पाच गावांची निवड करण्यात येणार आहे. गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना आवश्यक असलेली झाडे वनविभाग व सामाजिक वनिकरण विभागाद्वारे मागणीनुसार पुरविण्यात येतील, अशी माहिती मान्यवरांनी दिली. (प्रतिनिधी)