प्रत्येकाने एकास व्यसनमुक्त करण्याची शपथ घ्यावी
By admin | Published: March 21, 2017 12:20 AM2017-03-21T00:20:27+5:302017-03-21T00:20:27+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेल्या समान हक्कांमुळे आज व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महिलांना संधी मिळाली आहे.
सत्यपाल महाराज : पाचवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन
अमरावती : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेल्या समान हक्कांमुळे आज व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महिलांना संधी मिळाली आहे. व्यसनमुक्तीसाठी महात्मा गांधी, डॉ.आंबेडकर, संत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज या महापुरूषांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे एक छोटे काम मला सोपविण्यात आले आहे. हे काम संपूर्ण समाजाचे असून त्यासाठी प्रत्येकाने एका तरी व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याची शपथ घ्यावी, असे प्रतिपादन देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रबोधनकार सत्यपाल महाराजांनी केले.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने देशातील पाचवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आणि महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उद्योग, खनिकर्म व सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे उपस्थित होते. कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर, अभिनेत्री निशिगंधा वाड, समाजकल्याण विभागाचे आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, उपायुक्त भीमराव खंडाते, प्रादेशिक उपायुक्त दीपक वडकुते उपस्थित होते. यावेळी सत्यपाल महाराजांनी विनोदाच्या माध्यमातून व्यसन करणाऱ्यांंच्या डोळ्यात खणखणीत अंजन घातले. त्यांनी अनेक उदाहरणांच्या माध्यमांतून लोक व्यसनाच्या आहारी कसे जातात, हे पटवून दिले. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मार्गदर्शन करताना व्यसनाधिनतेवर प्रकाश टाकला. व्यसनाधिनता ही समाजाची मोठी समस्या असून दारूबंदी असणाऱ्या जिल्ह्यातही व्यसनाधिनता आढळून येते, याबद्दल खंत व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, मुक्ता पुणतांबेकर, निशिगंधा वाड यांनी व्यसनाधीन समाजनिर्मितीसाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
व्यसनमुक्ती साहित्य ठेवलेल्या ग्रंथदालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी व्यसनमुक्तीची शपथ सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सर्व उपस्थितांना दिली. प्रास्तविक पीयूष सिंह यांनी, तर संचालन रेणुका देशकर व आभार भालचंद्र मळे यांनी मानले. यावेळी राज्यातील अनेक व्यक्तींना व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. त्यामध्ये अमरावती येथील नीळकंठ बोरोळे व अचलपूर येथील अमोल चित्रकार यांचा समावेश आहे.