अमरावती जिल्ह्यातील वैभवशाली इतिहासाची साक्ष तळेगाव दशासरच्या पायऱ्यांच्या विहिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 12:33 PM2020-11-04T12:33:20+5:302020-11-04T12:33:51+5:30
Amravati News धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर हे इतिहासकालीन गाव. येथील पुरातन वास्तू, शिल्पकलेचे उत्तम नमुने असलेल्या अनेक देवतांच्या मूर्ती वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात.
नीलेश रामगावकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर हे इतिहासकालीन गाव. येथील पुरातन वास्तू, शिल्पकलेचे उत्तम नमुने असलेल्या अनेक देवतांच्या मूर्ती वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. पाण्यावर तरंगणाऱ्या विटा आजही परिसरात आढळतात. याशिवाय पायऱ्यांच्या विहिरी तर शिल्पकलेच्या उत्कृष्ट नमुना ठरल्या आहेत.
मारुती मंदिरातील पायऱ्यांची ही विहीर प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत पोहचण्यासाठी चारही बाजूने काम केलेल्या काळ्या पाषाणाने पायऱ्यांचे बांधकाम केलेले आहे.
या विहिरीच्या आत एक शिवालय व दगडी खांब आहेत. यावर सुंदर असे नक्षीकाम केले आहे. एकाच वेळी अनेक लोकांना पाणी भरता यावे म्हणून पायऱ्यांचे भक्कम बांधकाम करण्यात आले असावे. विहिरीतील पाणी नेहमी स्वच्छ राहावे म्हणून त्यामध्ये मंदिराचे बांधकाम करून अध्यात्माची जोड देण्यात आलेली दिसते. आजही दोन्ही विहिरींना मुबलक पाणी आहे.
तळेगाव येथील इतिहास संशोधक दिवंगत बाळकृष्ण घाटे यांचे अभ्यासानुसार, या विहिरी १३ व्या शतकातील अर्थात यादवकालीन आहेत. पुष्पासारख्या रचनेमुळे या विहिरींना पुष्करणा संबोधले जात होते. आजही मारुती मंदिर व शहीद दीपक ठाकरे चौक येथील विहिरी गावाचा ऐतिहासिक वारसा जपून आहेत.
ऐतिहासिक स्थळ
विहिरी पाहण्यासाठी आजही अनेक लोक तळेगावात येतात. या ऐतिहासिक वारशाचे जतन झाल्यास येथील पर्यटन व्यवसायास चालना मिळू शकते. पुरातत्त्व विभागाकडून संवर्धन व संशोधन झाल्यास तळेगाव दशासर हे पौराणिक व ऐतिहासिक स्थळ म्हणून उदयमान होण्यास मदतच मिळेल.