अभियांत्रिकी, फार्मसी, विधी सेमिस्टर निकालास विलंब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 06:49 PM2019-03-07T18:49:39+5:302019-03-07T18:50:06+5:30
हिवाळी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा; उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयांचे हिवाळी-२०१८ परीक्षेच्या अभियांत्रिकी, फार्मसी व विधी सेमिस्टरचे निकाल जाहीर होण्यास विलंब लागत आहे. उन्हाळी-२०१९ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असताना विद्यार्थ्यांना हिवाळी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आहे.
यंदा परीक्षा विभागाचा कारभार सुरळीत होण्यास बराच अवकाश लागला आहे. ऑनलाइन परीक्षांचे कामकाज माइंड लॉजिक एजन्सीकडून काढून घेतल्यानंतर नव्या एजन्सीकडे जबाबदारी सोपविली. मध्यंतरी बी.ए. भाग-१ च्या ४० हजार विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका काही तांत्रिक कारणांमुळे मिळाली नव्हती. सध्या अभियांत्रिकीच्या सेमिस्टर पॅटर्नचे निकाल जाहीर होण्यास विलंब लागत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सेमिस्टर १ व ६ चे निकाल जाहीर झाले नाहीत. फार्मसी व विधी अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर-१ चे निकाल याच आठवड्यात जाहीर करण्याची तयारी परीक्षा विभागाने चालविली आहे. हिवाळी परीक्षांचे निकाल हाती आले नसताना उन्हाळी परीक्षा येऊन ठेपल्याने विद्यार्थी हैराण आहेत. बी.फार्म. गृहपरीक्षेचा निकालदेखील लागला नाही.
डेटा ट्रान्सफरचे काम अंतिम टप्प्यात
ऑनलाइन परीक्षेशी निगडित सर्व जबाबदारी माइंड लॉजिक एजन्सीकडून काढून घेण्याचा निर्णय सिनेट सदस्यांनी घेतला होता. आता लर्निंग स्पायरल या एजन्सीकडे ती सोपविली आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षा व निकालाशी संबंधित डेटा ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया लांबलचक असल्याने हिवाळी परीक्षेचे निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, उन्हाळी परीक्षेचे निकाल वेळेत लागतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
तांत्रिक कारणाने निकाल जाहीर करण्यात आले नाहीत. विद्यार्थ्यांच्या डेटा ट्रान्सफरची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. उन्हाळी परीक्षा आणि निकालाचे नियोजन वेळेतच केले जात आहे. - हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग