सन्मती अभियांत्रिकीचे परीक्षा केंद्र होणार रद्द; त्रिसदस्यीय समिती चौकशीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 08:32 PM2019-06-06T20:32:08+5:302019-06-06T20:32:19+5:30
इंजिनीअरिंग मॅकेनिक्सचा पेपर फुटल्यानंतर चौकशीसाठी गठित या समितीची तातडीची बैठक सोमवारी पार पडली.
अमरावती : पेपरफूट प्रकरणात चर्चेला आलेल्या वाशिम येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्याच्या निर्णयाप्रत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची त्रिसदस्यीय चौकशी समिती पोहोचली आहे. त्यावर लवकरच यावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. इंजिनीअरिंग मॅकेनिक्सचा पेपर फुटल्यानंतर चौकशीसाठी गठित या समितीची तातडीची बैठक सोमवारी पार पडली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचारी बोरे आणि विद्यापीठातील अस्थायी कर्मचारी आशिष राऊत यांच्यात पेपरफूटसंदर्भात मिलिभगत असल्याचे प्राथमिक चौकशीअंती स्पष्ट झाले. त्यामध्ये सन्मती महाविद्यालयाचा सहभाग स्पष्ट झाला. अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, प्राचार्य ए.बी. मराठे आणि परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीने पेपरफूटप्रकरणी युद्धस्तरावर चौकशी आरंभली आहे. आठ दिवसांत ही समिती वस्तुनिष्ठ अहवाल कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना सादर करणार आहे.
दरम्यान, ४ जून रोजी पार पडलेल्या सिनेट सभेत स्वत: कुलगुरू चांदेकर यांनी याप्रकरणी आठ दिवसांत चौकशी करून हे प्रकरण पोलिसांत देणार असल्याची ग्वाही सिनेट सभेत दिली आहे. विद्यापीठ प्रशासन याप्रकरणी काय करणार आहे, हे सिनेट सभेत रेकॉर्डिंग झाले आहे. त्यामुळे पेपरफूटप्रकरणी विद्यापीठाने सिनेट सभेत दिलेला शब्द पूर्ण करण्याची तयारी चालविली आहे. मात्र, महाराष्ट्र सार्वजनिक कायदा २०१६ नुसार कलम ४८, ५ (अ) अंतर्गत निर्णय घेऊन विद्यापीठ प्रशासन सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
अस्थायी कर्मचा-यांनी हाताळले तीन अधिका-यांचे लॅपटॉप
पेपरफूट प्रकरण उघडकीस येण्यापूर्वी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अस्थायी कर्मचारी विनय रोहणकर हा परीक्षा संचालकांना उजवा हात म्हणून वावरत होता. एवढेच नव्हे तर पीएचडी सेल विभागाचे सुजय बंड, परीक्षा विभागातील अधिकारी मालधुरे यांचेदेखील रोहणकर हा लॅपटॉप हाताळत होता. ई-मेल आयडीसुद्धा त्याला माहिती आहे. पेपरफूट प्रकरणानंतर आशिष राऊत आणि विनय रोहणकर या दोन्ही अस्थायी कर्मचाºयांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. आशिष राऊत याचा मोबाईल विद्यापीठाने ताब्यात घेतला आहे.