परीक्षा, महाविद्यालयीन प्रवेश शुल्कात वाढ नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 06:00 AM2020-01-23T06:00:00+5:302020-01-23T06:00:29+5:30
विद्यापीठाने विविध परीक्षा शुल्क आणि महाविद्यालयांत प्रवेश शुल्कात वाढ प्रस्तावित केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. अमरावती विद्यापीठ क्षेत्रात ग्रामीण, शेतकरी कुटुंबातील मुलांचे महाविद्यालयात प्रवेश आहेत. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने पुणे, मुंबईच्या तुलनेने परीक्षा आणि महाविद्यालयात प्रवेशात वाढ करणे योग्य नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नत महाविद्यालयांत प्रवेश आणि परीक्षा शुल्कात वाढ नको, अशी मागणी निवेदन बुधवारी संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने केली. विद्यापीठात परीक्षा शुल्कवाढीविरुद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली. कुलसचिव तुषार देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.
विद्यापीठाने विविध परीक्षा शुल्क आणि महाविद्यालयांत प्रवेश शुल्कात वाढ प्रस्तावित केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. अमरावती विद्यापीठ क्षेत्रात ग्रामीण, शेतकरी कुटुंबातील मुलांचे महाविद्यालयात प्रवेश आहेत. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने पुणे, मुंबईच्या तुलनेने परीक्षा आणि महाविद्यालयात प्रवेशात वाढ करणे योग्य नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.
सेमिस्टर पॅटर्न परीक्षेमुळे गरीब, सामान्य कुटुंबांंतील विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. बॅकलॉग परीक्षेचे अर्ज भरताना ६०० रुपये शुल्क मोजावे लागतात, असे निवेदनात स्पष्ट केले आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठाने शैक्षणिक धोरणात खासगी महाविद्यालयांना प्रवेश शुल्कात वाढ करण्याची मुभा दिली असल्याचे संकेत आहेत. ही बाब सत्य ठरल्यास संभाजी ब्रिगेड विद्यापीठातच प्रवेशास अधिकाऱ्यांना मनाई करेल, असा इशारा देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितास्तव परीक्षा आणि महाविद्यालयीन प्रवेशात वाढ करू नये, या मागणीचा पुनरुच्चार संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली. यावेळी सहायक कुलसचिव व इतर अधिकारी उपस्थित होते. निवेदन देताना करण तायडे, अजित काळबांडे, सुयोग वाघमारे, प्रतीक कडू, कृणाल गावंडे, निखिल काळे, नीलेश सोनटक्के, हर्षल जाधव, अक्षय खडसे, शुभम भांबूरकर, सौरभ वऱ्हेकर आदी उपस्थित होते.
गत पाच वर्षांपासून परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली नाही. मात्र, यापूर्वी विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार परीक्षा शुल्क कमी करण्याबाबत समितीचे गठण करण्यात आले. समितीचा जो अहवाल येईल, तोच निर्णय प्रशासन घेणार आहे. महाविद्यालयात प्रवेश शुल्क निश्चितीबाबत समिती शुल्क ठरविते.
- तुषार देशमुख
कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ