आधी बारावीची परीक्षा, नंतर पित्याला भडाग्नी; मलकापूर परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:54 AM2019-03-01T00:54:26+5:302019-03-01T00:55:06+5:30
शेंदूरजनाघाट येथील मलकापूर परिसरातील योगेंद्र दुपारे हा बारावीचा विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत असताना अचानक वडिलांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. तथापि, शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये, ही वडिलांची शिकवण होती. त्यासाठीच काबाडकष्ट घेत असलेल्या वडिलांच्या प्रेरणेतून योगेंद्रने पेपर सोडविला आणि परतल्यानंतर वडिलांना भडाग्नी दिला.
वरूड : शेंदूरजनाघाट येथील मलकापूर परिसरातील योगेंद्र दुपारे हा बारावीचा विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत असताना अचानक वडिलांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. तथापि, शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये, ही वडिलांची शिकवण होती. त्यासाठीच काबाडकष्ट घेत असलेल्या वडिलांच्या प्रेरणेतून योगेंद्रने पेपर सोडविला आणि परतल्यानंतर वडिलांना भडाग्नी दिला.
शेंदूरजनाघाट येथील मलकापूर परिसरात वास्तव्यास असलेल्या मनोहर दुपारे यांनी अठराविश्वे दारिद्र्यातही मुलाला चांगले शिक्षण देण्याचा चंग बांधला. दुपारे दाम्पत्याने शेतमजुरी करून योगेशला बारावीपर्यंत शिकविले. यादरम्यान मनोहर दुपारे यांना कर्करोग जडला. मात्र, उपचाराची तमा न बाळगता त्यांनी योगेंद्रला शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली. बारावीची परीक्षा सुरू झाली असताना २६ फेब्रुवारीला सकाळी मनोहर दुपारे यांचे निधन झाले. ११ वाजता पेपर होता. पेपर दिला नाही, तर वर्ष वाया जाईल, शिक्षणाचा खेळखंडोबा होईल, या विचाराने योगेंद्रने आधी परीक्षा केंद्रावर पेपर सोडविला. दुपारी ४ वाजता वडिलांच्या चितेला त्याने भडाग्नी दिला. यावेळी शिक्षकांनी योगेंद्रला सावरण्यासाठी मदत केली तसेच विविध सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. समाजप्रबोधन मंचचे अध्यक्ष प्रवीण चौधरी, जायन्ट्सचे अध्यक्ष योगेश्वर खासबागे, अश्वपाल वानखडे, यशपाल जैन आदींनी दुपारे कुटुंबाला मदत केली.