विद्यापीठात परीक्षांचे नियोजन ढासळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:32 AM2019-04-29T01:32:02+5:302019-04-29T01:32:39+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या उन्हाळी २०१९ परीक्षेत अभियांत्रिकीसह बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी व अन्य शाखेच्या परीक्षांचे नियोजन ढासळले. चूक विद्यापीठाची मात्र मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या उन्हाळी २०१९ परीक्षेत अभियांत्रिकीसह बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी व अन्य शाखेच्या परीक्षांचे नियोजन ढासळले. चूक विद्यापीठाची मात्र मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. आॅनलाईन, आॅफलाईन अशा दोन्ही परीक्षेचा बोजवारा उडाला आहे.
२५ एप्रिलपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे पेपर सुरू झाले. मात्र, पहिल्याच दिवशी आॅनलाईन पेपर केंद्रावर तासभर उशिरा मिळाले. दुसऱ्या दिवशी आॅनलाईनऐवजी आॅफलाईन पेपर वितरित करण्याचा प्रसंग ओढवला आहे.
शनिवारी वाणिज्य शाखेचा पेपर तब्बल तासभर उशिरा सुरू झाल्याचा प्रकार स्थानिक विद्याभारती महाविद्यालय, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत निदर्शनास आला. बी.कॉम.प्रथम वर्षाच्या दुसºया सेमिस्टरचा इंग्रजीचा बॅकलॉगचा पेपर होता. मात्र, यावेळी विद्यार्थ्यांचे आसन क्रमांकात गोंधळ असल्याने परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालय प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
परीक्षेत आसन व्यवस्था ढासळल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याची ओरड आहे. आॅनलाईन आणि आॅफलाईनद्वारा परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाचे आहे. मात्र, उन्हाळी परीक्षा सुरू होताच विद्यापीठ प्रशासन परीक्षेच्या नियोजनात नापास झाल्याचे चित्र आहे.