तहान लागल्यावर खोदणार विहीर
By admin | Published: January 24, 2016 12:10 AM2016-01-24T00:10:57+5:302016-01-24T00:10:57+5:30
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे.
पाणी टंचाईच्या झळा : ७०८ गावांत होणार ७३६ उपाययोजना
गजानन मोहोड अमरावती
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईच्या कृती आराखड्यात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील एकाही गावात उपाययोजना केलेली नाही. ‘येरे माझ्या मागल्या’ हे सुरूच आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात ‘तहान लागल्यावर विहीर खोदणार आहे.’ यामध्ये जिल्ह्यातील ७०८ गावात ७३६ प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित आहे. यासाठी १० कोटी ९१ लाख ९० हजाराचा निधी खर्च करण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात १ जून ते ३० सप्टेंबर या पावसाच्या १२० दिवसात जिल्ह्यात किमान ७२१ मि. मी. पावसाची सरासरी अपेक्षीत असताना एकूण ८९ टक्के पाऊस पडला, यामध्ये केवळ तिवसा व अंजनगाव सुर्जी या तालुक्यांनी पावसाची सरासरी गाठली, उर्वरित १२ तालुक्यात सरासरी इतपतही पाऊस पडला नाही. पावसाअभावी खरीपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. अपुऱ्या पावसामुळे यंदा पाणी टंचाईचे दुर्भिक्ष्य जाणवणार हे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. पाणी टंचाईच्या कृती आराखड्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ या काळात जिल्ह्यातील एकाही गावात पाणीटंचाईचे नियोजन करण्यात आलेले नाही. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या कालावधीत १०४ गावांतील नळयोजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. यासाठी २ कोटी ९१ लाख ६९ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
१७७ विंधन विहिरी करणार
अमरावती : या टप्प्यात ३७ तात्पुरत्या नळयोजना घेण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी ६६ लाख ५० हजाराचा निधी खर्च करण्यात येणार आहे. तसेच १७७ नवीन विंधन विहीरी व कुपनलिका तयार करण्यात येणार आहे. तसेच ९३ विहीरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे व ६ ट्रॅक्टरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी १० लाख २० हजाराचा निधी असा एकूण दुसऱ्या टप्प्यात ६ कोटी ६७ लाख ९७ हजाराचा निधी जिल्ह्यात खर्च केल्या जाणार आहे.