चार मंडळात अतिवृष्टी, ८७ गावे बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:41+5:302021-07-20T04:10:41+5:30
अमरावती : जिल्ह्यात चार तालुक्यांना रविवारच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. चार महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने ८७ गावे बाधित ...
अमरावती : जिल्ह्यात चार तालुक्यांना रविवारच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. चार महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने ८७ गावे बाधित झाली. नदी-नाल्यांना पूर आले व ३,५६३ हेक्टर शेतातील पिके खरडून गेली. याशिवाय नाल्याला आलेल्या पुरात दोघे युवके वाहून गेले आहेत तसेच २६२ घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
जिल्ह्यात रविवारी दुपारी धारणी तालुक्यात साद्राबाडी, अमरावती तालुक्यात वलगाव व आसरा तसेच चांदूर बाजार तालुक्यात बेलोरा या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली त्या नदी नाल्यांना पूर येऊन काठालगतची ६४६ हेक्टरमधील पिके खरडली गेली. याशिवाय शेतात पाणी साचल्याने २,९१७ हेक्टरमधील पिके पेरणी व पिकांचे नुकसान झाले आहे.
प्राथमिक अहवालानुसार, भातकुली तालुक्यात ६९ गावे बाधित झाली. खारतळेगाव येथे दोघे युवक वाहून गेले. १४५ घरांचे नुकसान झाले तसेच ६४६ हेक्टरमधील शेती खरडून गेली. याशिवाय २,६६७ हेक्टरमधील पिके व पेरणीचे नुकसान झाले आहे. अचलपूर तालुक्यात दोन घरे, चांदूर बाजार तालुक्यात नऊ गावांमध्ये २४ घरांची पडझड झाली. याशिवाय चिखलदरा तालुक्यात एक घराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.