वरूड तालुक्यातून ओव्हरलोड रेतीची बेसुमार वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:40+5:302021-06-19T04:09:40+5:30
घाटांचे लिलाव थांबले, पोलीस, महसूलचे दुर्लक्ष वरूड : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात वाहन क्षमतेपेक्षा अधिक रेतीची तस्करी खुलेआम सुरू आहे. ...
घाटांचे लिलाव थांबले, पोलीस, महसूलचे दुर्लक्ष
वरूड : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात वाहन क्षमतेपेक्षा अधिक रेतीची तस्करी खुलेआम सुरू आहे. रेतीतस्करांची मनमानी सुरू झाली. काही महिन्यापूर्वी रेती तस्करीला चाप बसला होता. परंतु आता रेती तस्करांनी तोंड वर काढले आहे. प्रशासन डोळेझाक करत असल्याने यात कुठेतरी पाणी मुरत असल्याची चर्चा आहे.
महसूलचे फिरते पथक कुचकामी ठरत असल्याने आरटीओ आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहतूक सुरू आहे. रेतीतस्करी होत असताना पायलटिंग करून रस्ता मोकळा आहे, की काही अडचण आहे, याबाबत सतत सूचना दिली जाते. रात्रभर वर्धा नदीलगत मध्यप्रदेश हद्दीत ही वाहने उभी करून पहाटे साडेपाच वाजतापासून वाहतूक सुरू होते. नोव्हेंबर २०२० मध्ये परीविक्षाधीन आयपीएस अधिकारी तथा वरूडचे ठाणेदार श्रेणिक लोढा यांनी रेती तस्करीला चांगलाच चाप लावला होता. एकाच दिवशी ३५ डंपर जप्त करून वाहनमालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. यानंतर जानेवारी २०२१ पर्यंत रेती वाहतूक क्षमतेमध्येच सुरू होती. मात्र, आता पुन्हा रेतीतस्करांनी तोंड वर काढले आहे.
बॉक्स
रेतीघाटाचे लिलाव रखडले
तालुक्यात ७ रेतीघाट आहेत. यामध्ये देऊतवाडा, घोराड, पवनी, वंडली, वघाळ यांचा समावेश आहे. या रेतीघाटाचा लिलाव अद्यापही झाला नाही. या रेती घाटावरील रेती चोरीला उधाण आले असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. गत महिन्यात रेतीचोरांनी तलाठ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये गुन्हे दाखल झाले, अटकही झाली होती. परंतु, रेती चोरी सुरूच आहे.
तहसील कार्यालयाचा कारभार प्रभारीकडे
तहसीलदार किशोर गावंडे सेवानिवृत्त झाल्याने एक जूनपासून तहसील कार्यालायाचा कारभार नायब तहसीलदार घोडेस्वार यांचेकडे देण्यात आला. प्रभारी अधिकाऱ्यावर कारभार सुरू आहे. यामुळे येथे प्रत्येकच अधिकारी कर्मचारी तहसीलदारांच्या रुबाबात असल्याची चर्चा आहे.
कोट १
तालुक्यातून रेतीतस्करीला आळा घालण्याकरिता महसुली भरारी पथकाचे गठन करू. यापूर्वी असलेले पथके मध्यंतरी बंद झाली होती. तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव अद्याप व्हायचे आहेत.
- नंदकुमार घोडेस्वार, प्रभारी तहसीलदार