श्रीनिवास घाडगेंची बदली, नव्या तपास अधिकाऱ्याकडून अपेक्षा

By admin | Published: October 3, 2016 12:08 AM2016-10-03T00:08:35+5:302016-10-03T00:08:35+5:30

प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या विद्यार्थ्यांवर नरबळीच्या उद्देशाने झालेल्या हल्याच्या प्रकरणाचा तपास ज्यांच्याकडे होता,

Exchanging of Srinivas Ghadge, Expecting from New Investigation Officer | श्रीनिवास घाडगेंची बदली, नव्या तपास अधिकाऱ्याकडून अपेक्षा

श्रीनिवास घाडगेंची बदली, नव्या तपास अधिकाऱ्याकडून अपेक्षा

Next

दिलासा : नव्या अधिकाऱ्याची कार्यप्रणाली ठरवेल पोलिसांची छबी
अमरावती : प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या विद्यार्थ्यांवर नरबळीच्या उद्देशाने झालेल्या हल्याच्या प्रकरणाचा तपास ज्यांच्याकडे होता, त्या तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांची अवघ्या चार महिन्यांतच अखेर बदली झाली. घाडगे यांच्याजागी येणाऱ्या नव्या तपास अधिकाऱ्याकडून नरबळी प्रकरणाची पाळेमुळे खणली जावी, यासाठी संघर्ष करणाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
नरबळी प्रकरण संवेदनशील असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी या प्रकरणाचा तपास मुद्दामच प्रथम वर्ग अधिकारी श्रीनिवास घाडगे यांना दिला होता. घाडगे यांच्याकडे तपासाची सूत्रे येण्यापूर्वी ती मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार शैलेश शेळके यांच्याकडे होती. शेळके यांच्यावर बरेच आरोप झाल्यामुळे त्यांच्याकडील तपास काढण्यात आला होता. घाडगे यांनी या प्रकरणात सुमारे दोन महिने तपासकार्य केले. तपास करण्यालायकच्या मुद्यांचा ढीग घाडगेंपुढे होता; तथापि त्यांनी तपासादरम्यान बाळगलेली अनावश्यक गोपनीयता त्यांच्यावर संशय निर्माण करणारी ठरली. सामान्यांनी प्रथमेश आणि अजयच्या न्यायासाठी रान उठविले. परंतु तपासाबाबतची समाधानकारक माहिती घाडगे यांनी सामान्यांना कधीच दिली नाही. एका अल्पवयीनासह अटक करण्यात आलेल्या चार आरोपींशिवाय त्यांनी कुणालाही अटक केली नाही. आश्रमाचे ट्रस्टी शिरीष चौधरी, संस्थापक अध्यक्ष शंकर महाराज यांना अटक करण्याची मागणी जिल्हाभरातून ताकदीने करण्यात आली, मात्र व्यर्थ!
प्रथमेश सगणे याच्या कक्षात चोरून प्रवेश केल्याच्या कारणावरून शिरीष चौधरी आणि काही ट्रस्टींविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्याकडे प्रथमेशच्या नातेवाईकांनी तक्रार केली होती. त्याचीही घाडगे यांनी वेळीच दखल घेतली नसल्याचा आरोप होता. श्रीनिवास घाडगे यांच्याकडून तपास काढण्यात यावा, अशी मागणी त्यानंतर सामाजिक संघटनांनी लावून धरली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात या मागणीसाठी नारेबाजीही करण्यात आली होती. घाडगे यांची बदली झाल्यामुळे आता तपास त्यांच्याकडून निघाला खरा; परंतु येणारा अधिकारी नरबळी प्रकरणाचा तपास किती संंवेदनशीलपणे करेल, यावर त्यांच्याविषयीची प्रतिमा निर्माण होणार आहे. पोलिसांची छबी निर्माण करणे किंवा मलिन करणे हे तपास अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवरून ठरावे, इतके याप्रकरणी सामान्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
ज्या आश्रमात नरबळीची प्रकरणे घडलीत त्या आश्रमातील पदाधिकाऱ्यांचा कसून तपास करावा, पालकत्त्वाची भूमिका स्वीकारलेल्या आश्रम ट्रस्ट पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, प्रथमेश सगणेच्या खोलीत चोरून प्रवेश करणाऱ्या आणि त्या कारणासाठी ज्यांची तक्रार करण्यात आली त्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवावे, मुख्य आरोपी सुरेंद्र मराठे याने नावे घेतलेल्या आश्रमातील पदाधिकाऱ्यांवरही नरबळीचे गुन्हे नोंदविण्यात यावेत, आश्रमात घडलेल्या संशयास्पद मृत्युंच्या मालिकेचा तपास बारकाईने करावा, यापूर्वीच्या अपमृत्युचे रीतसर शवविच्छेदन होऊ न देणाऱ्या आश्रमातील जबाबदार लोकांना अटक ेरावी, आश्रम ट्रस्टचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमावा, शंकर महाराजांच्या आजतागायतच्या आक्षेपार्ह बाबींविषयी ज्या कुणाला माहिती आहे, त्यांची मदत तपासकामी घ्यावी आदी मागण्या याप्रकरणाशी जुळलेल्या लोकांच्या आहेत.

Web Title: Exchanging of Srinivas Ghadge, Expecting from New Investigation Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.