उमेदवारीच्या मुद्यावरून उत्कंठा शिगेला

By admin | Published: June 8, 2014 11:31 PM2014-06-08T23:31:40+5:302014-06-08T23:31:40+5:30

सुनील देशमुख यांचे ऐनवेळी पंख छाटून राष्ट्रपती पुत्राला लाँच केल्यामुळे २00९ सालची अमरावती विधानसभेची निवडणूक देशभरात सर्वाधिक उत्कंठेची व प्रतिष्ठिेची ठरली होती. उमेदवार बदलाच्या मुद्यावरून

Excite Shigella from the issue of candidature | उमेदवारीच्या मुद्यावरून उत्कंठा शिगेला

उमेदवारीच्या मुद्यावरून उत्कंठा शिगेला

Next

संजय खोडकेंच्या नावाची चर्चा भाजपातून
गणेश देशमुख  -अमरावती
सुनील देशमुख यांचे ऐनवेळी पंख छाटून राष्ट्रपती पुत्राला लाँच केल्यामुळे २00९ सालची अमरावती विधानसभेची निवडणूक देशभरात सर्वाधिक उत्कंठेची व प्रतिष्ठिेची ठरली होती. उमेदवार बदलाच्या मुद्यावरून यावेळीही अमरावतीच्या वातावरणात उष्णता जाणवू लागली आहे.
रावसाहेबांना तिकीट दिल्यावर काँग्रेसच्या कुणाही नेत्याला न जुमानणारे सुनील देशमुख निवडणुकीनंतर मात्र घराबाहेर निघालेच नव्हते. महापालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी स्थापन केलेली जनविकास काँग्रेस ही अल्पायुषी राजकीय घडामोड वगळता, राजकीय संन्यास घेतला असावा, अशीच सुनील देशमुखांची एकंदर वागणूक होती. आपला नेता राजकीय हालचालीच करीत नाही म्हटल्यावर त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी स्वत:चे पुनर्वसन करवून घेतले. तरीही शांतच असलेले सुनील देशमुख लोकसभा निवडणुकीपासून अचानक सक्रिय झाले आहेत. पाच वर्षे कमालीचे शांत असलेल्या सुनील देशमुखांनी सारी शक्ती आगामी विधानसभा आखाड्यासाठीच तर राखून ठेवली नव्हती ना, असा प्रश्न त्यांच्या अंतर्गत सक्रियतेचा वेग बघितल्यावर मनाला स्पशरून जातो.
लोकसभा निवडणुकीदरम्यान सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाची तारीखही निश्‍चित झाली होती. निवडणुकीच्या धामधुमीत पक्षप्रवेश  केल्यास हवे तसे मायलेज मिळणार नाही, हे हेरून त्यांनी निवडणुकीनंतर काँग्रेस प्रवेश करण्याचा बेत मनी आखला होता. तथापि, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरुद्धचा संताप इतका उफाळलेला दिसला की, निष्कासनाच्या कारवाईनंतरही मी काँग्रेसच्याच विचारधारेचा, असे कायम सांगत आलेले सुनील देशमुखही डगमगले. अच्छे दिनच्या काही जाहिरातींवर त्यांची प्रतिमा म्हणूनच अंकित झाल्याचे बघता आले. गॉडफादर विलासराव देशमुखांच्या जाण्याने आधार गमावलेल्या सुनील देशमुखांचे स्थानिक काँग्रेसमध्ये शत्रुच अधिक आहेत. आता भाजपक्षाच्याच तिकिटावर दंड थोपटणे सर्व दृष्टीने सुज्ञ निर्णय असेल, अशा निर्णयाप्रत सुनील देशमुख पोहोचले आहेत. भाजपक्षाच्या काही बड्या नेत्यांशी त्यांचा संपर्क सुरू आहे.
रावसाहेब शेखावतांनी अमरावती विधानसभेसाठी नियोजनबद्ध कार्य बर्‍याच दिवसांपासून सुरू केल्यामुळे ते अमरावतीतून लढणार की, जळगाव जिल्ह्यातून ही मध्यल्या काळात अचानक सुरू झालेली चर्चा आता निर्थक ठरली आहे. प्रतिस्पध्र्यांच्या तुलनेत रावसाहेबांचा राजकीय अनुभव तसा खूप जास्त नसला तरी त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्षाचे दिग्गज आणि धुरंदर आहेत. दांडगा अनुभव नसला तरी ज्यांच्याजवळ तो आहे, अशांचे मार्गदर्शन रावसाहेबांना सहज उपलब्ध आहे. त्या-त्या क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा करणे, मुद्दे समजवून घेणे, काही महत्त्वाचे वाटल्यास त्याची नोंद घेणे, ही रावसाहेबांच्या राजकारणातील जमेची बाजू. सुनील देशमुख यांनी टाकलेला प्रत्येक डाव कसा निकामी करायचा हे ठरविण्यासाठी रावसाहेबांकडे ब्रेन्स आहेत. रावसाहेबांनी विधानसभेच्या रणांगणावर रोवलेली नजर शक्ती आणि युक्तीची आहे.
मोदींच्या लाटेमुळे आता शिवसेना आणि भाजपक्षाचा उत्साह कमालीचा ओसंडून वाहतोय. विधान परिषदेवर निवडून आलेले प्रवीण पोटे भाजपचे एकुलते एक आमदार. २0१४ सालचा अमरावती शहरातील आमदार भाजपक्षाचाच असेल, असे वक्तव्य आमदार होण्यापूर्वीच त्यांनी ज्या विश्‍वासाने केले होते, त्याचवेळी कुछ कर गुजरने की तमन्ना अधोरेखित होत होती. आता तर भाजपक्षाचा सुवर्णकाळच अवतरला आहे. गडकरींच्या जवळचे असलेले पोटे अमरावती शहर ताब्यात घेण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करीत आहेत. मोदींची सभा आयोजित करणारे भाजपक्षाचे खंबीर कार्यकर्ते, आरएसएसचे काही जुणेजाणते भगवा रोवण्यासाठी पोटेंच्या सोबतीला आहेतच.
खासदार आनंदराव अडसूळ निवडून आल्यानंतर शिवसेनेच्या गोटातील उत्साह कमालीचा दुणावला आहे. पूर्वी अमरावती विधानसभेसाठी विचारच न करणारे शिवसेना नेते आता अमरावतीत शिवसेनेचा आमदार असावा, अशी मनीषा बाळगून आहेत. स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू झालेली आहे. बडनेर्‍यातून रिंगणात उतरण्यासाठी सज्ज असलेले दिगंबर डहाके, संजय बंड, तसेच माजी खासदार अनंतराव गुढे या नावांची  चर्चा सेनेच्या विविध गोटांतून अमरावती विधानसभेसाठी सुरू झालेली आहे.
 

Web Title: Excite Shigella from the issue of candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.