खळबळजनक! गोरगरीबांनी जमा केलेल्या अल्पबचतीच्या लाखो रुपयांवर चक्क पोस्ट मास्तरनेच मारला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 08:49 PM2022-01-03T20:49:13+5:302022-01-03T20:56:04+5:30

Amravati News अतिशय कष्टाने केलेल्या कमाईतील चार पैसे ‘अल्प बचत’ म्हणून पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा जमा करणाऱ्या त्या गोरगरीब खातेदारांना तसूभरही कल्पना नव्हती की, त्यांच्या या पैशांवर चक्क पोस्ट मास्तरच डल्ला मारत आहे.

Exciting! The postmaster himself grabbed millions of rupees saved by the poor | खळबळजनक! गोरगरीबांनी जमा केलेल्या अल्पबचतीच्या लाखो रुपयांवर चक्क पोस्ट मास्तरनेच मारला डल्ला

खळबळजनक! गोरगरीबांनी जमा केलेल्या अल्पबचतीच्या लाखो रुपयांवर चक्क पोस्ट मास्तरनेच मारला डल्ला

Next
ठळक मुद्देचांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथील धक्कादायक प्रकार गुंतवणूकदारांच्या ३५ लाखांवर डल्ला, अनेकांचे पासबुक गहाळ

अमरावती : अतिशय कष्टाने केलेल्या कमाईतील चार पैसे ‘अल्प बचत’ म्हणून पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा जमा करणाऱ्या त्या गोरगरीब खातेदारांना तसूभरही कल्पना नव्हती की, त्यांच्या या पैशांवर चक्क पोस्ट मास्तरच डल्ला मारत आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या घोटाळ्याचे बिंग सोमवारी फुटले अन् अनेकांच्या पायाखालची वाळूच सरकली. एक-दोन नव्हे, तब्बल ३५ लाख रुपयांचा हा घोटाळा चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड पोस्ट ऑफिसमध्ये झाला आहे.

जानराव किसनराव सवई असे मांजरखेड येथील शाखा पोस्ट मास्तरचे नाव आहे. त्याला या कामात मदत करणाऱ्या सहायक पोस्ट मास्तर डी.जी. गुल्हाने, डाकघर पर्यवेक्षक डी.एन. भाग्यवंत यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. या तिघांना निलंबित करण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

विशेष म्हणजे, ज्यांच्या रकमेवर डल्ला मारण्यात आला, अशा गुंतवणूकदारांची संख्या मोठी असून ३५ लाखांचा हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मास्टर माईंड सवईची सवयच!

बचत खाते, आर्वती खाते आणि फिक्स डिपॉझिट या खात्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या खातेदारांकडून रक्कम जमा झाल्यानंतर त्याची पासबुकवर रीतसर नोंद केली जायची. तथापि, ती रक्कम खात्यात जमा न करता परस्पर वापरण्यात आली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. ही रक्कम ३५ लाख ८ हजार ८७९ रुपयांच्या घरात आहे.

पासबुकमध्ये नोंद असलेल्या आणि प्रत्यक्षात जमा करण्यात आलेल्या रकमेचा ताळमेळ जुळत नसल्याने हा गंभीर प्रकार चांदूर रेल्वे येथील उपडाकपालांच्या लक्षात आला. त्यानंतर १६ जुलै २०२१ रोजी सवई याला निलंबित करण्यात आले. सहायक अधीक्षक डाकघर (दक्षिण उपविभाग, अमरावती) संगीता रत्तेवार यांनी २४ डिसेंबर रोजी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पुरावे नष्ट करण्यासाठी पासबुक गहाळ

आपले पितळ उघडे पडले, आता आपली गय नाही, ही बाब लक्षात येताच सवई याने डी.जी. गुल्हाने, डी.एन. भाग्यवंत यांच्या मदतीने काही खातेधारकांचे पासबुक आपल्या ताब्यात घेऊन ते गहाळ केल्याचे दुसरे प्रकरण लक्षात आल्यानंतर सवई याला मदत करणाऱ्या दोघांनाही निलंबित करण्यात आले. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार देण्यात आली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Web Title: Exciting! The postmaster himself grabbed millions of rupees saved by the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.