श्रीक्षेत्र सालबर्डीत हातभट्टीसह विदेशी दारूविक्रीला उधाण
By admin | Published: August 24, 2015 12:30 AM2015-08-24T00:30:58+5:302015-08-24T00:30:58+5:30
मध्य प्रदेश क्षेत्रातील सालबर्डी येथे हातभट्टीसोबतच विदेशी दारुची विक्री राजरोसपणे सुरु असल्याने श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांचे विक्रेत्यांना अभय : महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐेरणीवर
रोहितप्रसाद तिवारी मोर्शी
मध्य प्रदेश क्षेत्रातील सालबर्डी येथे हातभट्टीसोबतच विदेशी दारुची विक्री राजरोसपणे सुरु असल्याने श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
येथून आठ किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील सालबर्डी येथे सध्या सुरु असलेल्या श्रावण महिन्यात विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून महिला-पुरुषभक्त मंडळी दर्शनाकरिता येतात. सातपुडा पर्वतातील महादेवाची गुहा ही मध्य प्रदेश राज्याच्या सीमेत येते. पर्वतावर चढण्यापूर्वी पहिली पायरी म्हणून ओळखली जाणाऱ्या परिसरात पूजेच्या साहित्यासोबतच चहा-फराळाची दुकाने थाटण्यात आलेली आहेत.
या सर्वच टपऱ्या आणि दुकानांतून सर्रास विदेशीसह हातभट्टीच्या दारुची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. याशिवाय भुयारी मार्गावरील लहान पुलाच्या पुढे आणि साधारणत: एक किमी अंतरावरील नदी किनारी एका झाडाच्या आडोशाने उभारलेल्या टपरीतही अशीच दारु मद्यपींना उपलब्ध करुन दिली जात आहे.
श्रावण महिन्यातच नव्हे, तर एरवी संपूर्ण बाराही महिने श्रध्दाळू पर्यटक आणि महाविद्यालयीन, शाळकरी विद्यार्थी सालबर्डीला येतात, भुयारातील महादेवाच्या पिंडीचे दर्शनही घेतात. त्यात महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते; तथापि येथे खुलेआम मिळणाऱ्या दारुमुळे मद्यपींचा त्रास या पर्यटकांना आणि भक्तांना सहन करावा लागतो. त्यातून अप्रिय घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
संपूर्ण परिसर मध्य प्रदेश क्षेत्राच्या आठनेर पोलीस ठाण्यात येतो. सालबर्डीपासून आठनेर पोलीस ठाणे कित्येक किमी दूरवर असल्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवसांत येथे भरत असलेल्या यात्रेत दारूचा महापूर वाहतो. मात्र पोलीस प्रशासनाचे सालबर्डी आणि तेथील अवैध धंद्याकडे दुर्लक्ष असते. त्यामुळे भीतीयुक्त वातावरणात भाविक तथा पर्यटकांना यात्रा करावी लागते.
पर्यटक आणि भक्तांच्या सुरक्षिततेकरिता या परिसरात विकली जाणाऱ्या अवैध देशी-विदेशी दारुविक्रेत्यांवर कठोर कारवाई दोन्ही राज्यातील पोलिसांनी संयुक्तरीत्या करावी, अशी मागणी पर्यटकांनी केली जात आहे.
संयुक्त कारवाई केवळ कागदोपत्रीच
महाशिवरात्रीच्या यात्रेपूर्वी दोन्ही राज्याच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक दरवर्षी होते.त्यात अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी संयुक्त कारवाई करण्याचे ठरविण्यात येते. मात्र ही कारवाई फक्त यात्रा कालावधीतच पाहावयास मिळते, त्यानंतर परिस्थिती जैसे थे राहत असल्याचे दिसून येते.